मुलानेच दिले मातेच्या हाती भिक्षापात्र !
By Admin | Updated: May 10, 2015 01:07 IST2015-05-10T01:07:16+5:302015-05-10T01:07:16+5:30
आज मोठ्या उत्साहाने मातृदिन साजरा केला जाणार आहेत. या दिनाचे औचित्य साधून जन्मदात्या आईची मनोभावे पूजा केली जाणार आहे.

मुलानेच दिले मातेच्या हाती भिक्षापात्र !
रूपेश कोकावार चंद्रपूर (बाबूपेठ)
आज मोठ्या उत्साहाने मातृदिन साजरा केला जाणार आहेत. या दिनाचे औचित्य साधून जन्मदात्या आईची मनोभावे पूजा केली जाणार आहे. एकीकडे आई आणि मुलांच्या पवित्र नात्याची गुंफन सांगणारा भावविभोर सोहळा साजरा होत असताना दुसरीकडे या नात्यातील विदारक चित्रही मनाला सुन्न करून जात आहे. घरची परिस्थिती अत्यंत चांगली असताना एका मुलाने त्याच्या जन्मदात्या आईला अक्षरश: भिकेला लावले आहे. ही अभागिनी दिवसभर हातात भिकेचा कटोरा घेऊन वणवण फिरत आहे.
काळाच्या ओघात ‘माणूस’ बदलतो. तशी त्याची जगण्याची जीवणशैलीेही बदलते. मात्र हा बदल घडत असताना अलिकडे नात्यांचाही मनुष्याला विसर पडत चालला आहे. मात्र खुद्द आपल्या जन्मदात्याचाच विसर पडतो, तेव्हा मात्र जीवनशैली बदलली नाही तर माणुसकीच हरवत चालल्याचा प्रत्यय येतो. ज्याने अंगाखांद्यावर खेळवले, ज्या मातेने असह्य वेदना हसत सहन करीत नऊ महिने उरात गोंजारले. आपला हात देऊन चिमुकल्या पावलांना चालायला शिकवले. मात्र आपल्या पोटाचा गोळा पुढे आपल्याच पोटात गोळा उठवेल, तर अशा मातेने ममत्वाची कहाणी कुठे सांगावी ?
भिवापूर येथील रहिवासी ८५ वर्षीय वृद्धा सध्या याच प्रश्नाचे उत्तर शोधत फिरत आहे. तिला तिच्याच कुटुंबियांनी दगा दिल्याने एखाद्या सावलीच्या ठिकाणी बसून अक्षरश: भिक्षा मागण्याची वेळ तिच्यावर आज ओढवली आहे.
पाच मुले, चार मुली, नातवंड असा कुणालाही हेवा वाटावा, असा तिचा संसार. तरीही त्या ८५ वर्षीय वृद्धेवर भिक्षा मागून जगण्याची वेळ यावी. ही या वृद्धेसाठी आणि पर्यायाने सर्वच मातांसाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. भिवापूर रहिवासी लक्ष्मीवर (बदललेले नाव) आज ही वेळ आली आहे. विशेष म्हणजे, तिच्याच मुलाच्या निर्देशावरून तिचा नातु तिला भिक्षा मागण्यासाठी सकाळी शहरात सोडतो आणि सायंकाळ झाली की घ्यायला येतो. हा प्रकार मागील अनेक महिन्यांपासून सुरु आहे. सकाळपासून भिक्षा मागण्यासाठी वणवण भटकून थकलेल्या लक्ष्मीचे डोळे सुर्य मावळताच नातू न्यायला येणार आणि मी घरी जाईल, या आशेने रस्त्याच्या दिशेने लागलेले असतात. काही वेळातच तिचा नातूही येतो, अन जमा झालेले चिल्लर पैसे एखाद्या दुकानात देऊन ठोक घेऊन आॅटोमध्ये बसून माणुसकी हरविलेल्या मार्गावर मार्गस्थ होतो.