उपअधीक्षकासह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2017 00:29 IST2017-05-21T00:29:20+5:302017-05-21T00:29:20+5:30

शहराजवळच्या वडसा रोड लगत असलेल्या शेतजमिनीच्या रेकॉर्डमध्ये दुरुस्ती करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ....

Both arrested with Deputy Superintendent | उपअधीक्षकासह दोघांना अटक

उपअधीक्षकासह दोघांना अटक

१५ हजारांची लाच : भूमी अभिलेख विभागात रेकॉर्ड दुरूस्ती प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : शहराजवळच्या वडसा रोड लगत असलेल्या शेतजमिनीच्या रेकॉर्डमध्ये दुरुस्ती करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ब्रह्मपुरी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकासह दोघांना शनिवारी रंगेहात अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव उपअधीक्षक सिडनी गिलबर्ट थॉमस (५४) आणि सुरेश नान्हे (३५) रा. गुजरी वार्ड, ब्रह्मपुरी असे आहे.
या घटनेतील तक्रारकर्ता व्यक्ती ब्रह्मपुरी येथील रहिवासी आहे. त्यांच्या आजीच्या नावाने शहराजवळच्या वडसा रोडलगत सर्व्हे नं. ६६७ आराजी १.६२ आर शेती आहे. या शेतीचा पूर्वीचा सर्व्हे नं. ७८२ होता. त्यांच्या शेतील लगत मागील भागात ताराचंद झुरे याचे जुना सर्व्हे नं. ६६७ व नवीन सर्व्हे नं. ७८२ ची शेत आहे. त्यांच्या शेतीच्या मोजणीनंतर हा क्रमांक बदलून मिळाला. तर तक्रारकर्त्याच्या आजीच्या शेतीचा सर्व्हे नं. ६६७ झाला. त्याकरिता त्यांनी रेकॉर्ड दुरूस्तीकरतिा ब्रह्मपुरीचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांकडे अर्ज सादर केला. त्यावर कार्यवाही करीत उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्या अर्जावर चंद्रपूर येथील जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधीक्षकांकडून अभिप्राय मागितला.
या प्रकरणी नागपूर विभागीय आयुक्तांकडून पुनर्विलोकन परवानगी प्राप्त करून नागपूर विभागाचे अपर आयुक्तांकडे दाद मागितली. त्यावेळी अपर आयुक्तांनी ब्रह्मपुरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना सविस्तर चौकशी करण्याचे सांगून नव्याने आदेश पारित करण्याची सूचना केली. त्यामुळे उपविभागीय अधिकाऱ्यांनी ब्रह्मपुरी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकांना नव्याने चौकशी करून त्या शेतजमिनीच्या रेकॉर्डमध्ये दुरूस्ती करण्यास सांगितले. तसेच त्यांनी दुरूस्ती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. हे पत्र तक्रारदाराने उपअधीक्षक सिडनी गिलबर्ट थॉमस यांना ५ एप्रिल रोजी सादर केले.
त्यानंतर तक्रारकर्त्याने भूमी अभिलेख उपअधीक्षक थॉमस याला दोन-तीन वेळा भेटून दुरुस्ती अहवालाविषयी विचारणा केली. त्यानंतर पुन्हा तक्रारदाराने १८ मे रोजी उपअधीक्षक थॉमस याची भेट घेतली. तेव्हा थॉमस याने शेतजमिनीचा रेकॉर्ड दुरुस्त करून त्याचा अहवाल उपविभागीय अधिकाऱ्याकडे पाठविण्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी केली. तक्रारकर्त्याने लाचेची रक्कम कमी करण्याची मागणी केली. परंतु उपअधीक्षक थॉमस २५ हजार रुपयांवर अडून होता. त्यामुळे तक्रारदाराने पैसे देण्यास होकार दिला. परंतु तक्रारकर्त्याला लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्याअनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी सापळा रचला. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक व्ही. पी. आचेवार, मनोहर एकोणकर, महेश मांढरे, संतोष यलपूलवार, अजय बागेसर, समीक्षा भोंगळे, दिनेश देवाडे आदींनी केली.

खासगी व्यक्तीच्या माध्यमातून लाच
उपअधीक्षक थॉमस याची भेट घेऊन तक्रारकर्त्याने लाचेच्या रकमेत वाटाघाटी करण्याची मागणी केली. त्यानंतर थॉमसने १५ हजार रुपये स्वीकारून तक्रारकर्त्यांच्या आजीच्या नावे असलेल्या शेतजमिनीच्या रेकॉडमध्ये दुरुस्ती करून तो अहवाल ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकाऱ्याकडे पाठविण्यास होकार दिला. ही लाचेची रक्कम थॉमस याने सुरेश नान्हे याच्या माध्यमातून स्वीकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले.

Web Title: Both arrested with Deputy Superintendent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.