ढिलाईतून जन्मास येऊ शकतात दारू तस्कर
By Admin | Updated: April 24, 2015 00:54 IST2015-04-24T00:54:51+5:302015-04-24T00:54:51+5:30
कायदा जिथे ढिला पडतो, तिथूनच गुंडगिरी डोकावायला सुरूवात होते, हा सार्वत्रिक अनुभव आहे.

ढिलाईतून जन्मास येऊ शकतात दारू तस्कर
रुपेश कोकावार बाबुपेठ(चंद्रपूर)
कायदा जिथे ढिला पडतो, तिथूनच गुंडगिरी डोकावायला सुरूवात होते, हा सार्वत्रिक अनुभव आहे. जिल्ह्यात दारूबंदी यशस्वी व्हावी यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असले तरी अनेक ठिकाणी दिसत असलेल्या ढिलाईमुळे नवे तरूण या व्यवसायात उतरण्यासाठी संधीच्या शोधात आहेत. अंमलबजावणीतील ढिलाईतून उद्याचे दारूतस्कर जन्मास येण्याची भीती असल्याने ही धोक्याची घंटा आहे.
जिल्ह्यात दारूबंदी झाल्यापासून तळीरामांना आपली ‘तहान’ भागविण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पोलिसाच्या धाकाने अनेक दारुविक्रते शांत बसले आहेत. अवैध दारूविक्रीच्या अडड््यांवरही सन्नाटा दिसत आहे. असे असले तरी जिल्ह्याबाहेरुन येणारी दारु रोखण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत. ही संधी शोधून अनेक तळीराम आणि तळीरामांची काळजी वाहणारे आता जिल्हा ओलांडत आहेत. बाहेर जिल्ह्यातून आठ ते दहा दिवस पुरेल इतका दारुसाठा ते सोबत घेऊन येतात, अशी माहिती आहे. प्रवासाचा खर्च वसूल व्हावा यासाठी आणलेल्या दारुपैकी थोडी अगदी जवळच्यांना विकण्याचे प्रकारही हळूहळू वाढत आहेत. त्यामुळे सकाळपासूनच शहरातील काही मोक्याच्या पानटपऱ्यांवर गर्दी दिसायला लागली आहे. हा प्रकार असाच वाढत राहीला तर, चंद्रपूरचे वर्धा आणि गडचिरोली होण्याची दाट शक्यता आहे. कमी वेळात जास्त पैसे मिळवण्याच्या लालसेपोटी छुप्या मार्गाने आणलेली दारु अगदी गुप्तपणे विकण्याचा अवैध धंदा काही युवकांनी सुरु केला आहे. सुरुवातीला हे तरुण स्वत:च्या गरजेपुरती दारु आणून गरज भागवत होते. परंतु जिल्ह्याच्या सिमेपलिकडून दारु आणणे त्यांना सहज शक्य असल्याने आता यातून अर्थाजन करण्याचा मार्ग या युवकांनी शोधला आहे. यावर लवकर आळा बसणे गरजेचे आहे. अन्यथा या युवकांतूनच उद्या कुणी दारू तस्कर म्हणून उदयास येण्याची शक्यता नाकारता येत नाही.