बोगस बदली प्रकरण: चौकशी अधिकारी बदलला
By Admin | Updated: September 10, 2016 00:50 IST2016-09-10T00:50:26+5:302016-09-10T00:50:26+5:30
बोगस शिक्षक बदली प्रकरणाचा तपास पीएसआय मुनगेलवार यांच्याकडून काढून टाकण्यात आला असून...

बोगस बदली प्रकरण: चौकशी अधिकारी बदलला
गडचिरोलीच्या ठाणेदारांकडे सूत्र : ‘त्या’ दोन मास्टर मार्इंड कर्मचाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू
गडचिरोली : बोगस शिक्षक बदली प्रकरणाचा तपास पीएसआय मुनगेलवार यांच्याकडून काढून टाकण्यात आला असून सदर तपास गडचिरोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय पुराणिक यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणातील खरे सूत्रधार असलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा शोध पोलिसांकडून सुरू झाला आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांपैकी २२० शिक्षकांच्या बोगस बदल्या २०१३ साली करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी तब्बल तीन वर्षानंतर जिल्हा परिषदेतील लिपीक रूपेश शेडमाके याला अटक केली. सध्या रूपेश शेडमाके हा न्यायालयीन कोठडीची हवा खात आहे. पोलिसांच्या तपासादरम्यान या प्रकरणात त्यावेळी जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांची नावे सांगितली आहेत. या प्रकरणात गुंतून असलेल्या शिक्षकांनी सुध्दा याच दोघांची नावे सांगितले आहेत. सदर बोगस प्रकरण उघडकीस आल्यानंतर संबंधित दोन कर्मचाऱ्यांच्या बदल्या इतर तालुक्यामध्ये करण्यात आल्या होत्या. रूपेश शेडमाके याने आपले नाव तपासामध्ये सांगितले असल्याची कुणकुण माहित होताच हे दोघेही फरार झाले आहेत. या प्रकरणात हे दोघेच खरे मास्टर मार्इंड आहेत.
रूपेश शेडमाकेच्या जबाबावरून पोलिसांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास बजाविले होते. मात्र आरोपी त्यापूर्वीच फरार झाले आहेत. मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून पोलीस संबंधित कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र अजूनपर्यंत या दोन कर्मचाऱ्यांचा शोध लागलेला नाही. शिक्षक बोगस बदली प्रकरणातील हे दोघेच व्यक्ती खरे सूत्रधार असल्याने त्यांच्या अटकेनंतर बरीच माहिती समोर येणार आहे. सदर दोन कर्मचारी आणखी इतरही व्यक्तींची नावे सांगणार असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत.
रेल्वेसाठी जमीन अधिग्रहणाचे काम
गडचिरोली : वडसा-गडचिरोली या ५२ किमी लांबीच्या बहूप्रलंबित रेल्वे मार्गाच्या जमीन अधिग्रहण कामाला वेग आला आहे. या रेल्वे मार्गासाठी वन, महसूल व खासगी शेतमालकांची जमीन लागणार आहे. ही जमीन मिळविण्याच्या दृष्टीकोणातून अलिकडेच गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक व रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर खासगी जमीन अधिग्रहण करण्याच्या दृष्टीकोणातून शेतकऱ्यांचे सातबारे तपासण्याचे काम महसूल विभागाने हाती घेतले आहे, अशी माहिती गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अशोक नेते यांनी दिली.वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी विद्यमान केंद्र सरकारने दोन अर्थसंकल्पात ८० लाख रूपयाचा निधी प्रतीवर्षी मंजूर केला आहे. त्यामुळे देसाईगंज रेल्वेस्थानकावर पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचे काम सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)
तपासाला येणार गती
शिक्षक बोगस बदली प्रकरणाचा तपास यापूर्वी गडचिरोली ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक मुनगेलवार यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र काही शिक्षक संघटनांनी मुनगेलवार यांच्याकडून तपास काढून घेण्याची विनंती जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी मुनगेलवार यांच्याकडून तपासाची सुत्रे काढून घेऊन तपास ठाणेदार विजय पुराणिक यांच्याकडे सोपविला आहे. तपासाला गती मिळण्याची शक्यता शिक्षक वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.