बोगस चिटफंड कंपन्या करताहेत नागरिकांची लूट
By Admin | Updated: September 13, 2015 00:53 IST2015-09-13T00:53:05+5:302015-09-13T00:53:05+5:30
गुंतवणुकीच्या नावाखाली आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून आणि शासनाची परवानगी असल्याचे भासवून अनेक बोगस गुंतवणूक कंपन्या नागरिकांकडून कोट्यवधी रूपये जमा करीत आहेत.

बोगस चिटफंड कंपन्या करताहेत नागरिकांची लूट
शहर काँग्रेसचे निवेदन : कारवाईची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
चंद्रपूर : गुंतवणुकीच्या नावाखाली आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून आणि शासनाची परवानगी असल्याचे भासवून अनेक बोगस गुंतवणूक कंपन्या नागरिकांकडून कोट्यवधी रूपये जमा करीत आहेत. नागरिकांचा विश्वास संपादन करून अचानकपणे कार्यालयाला टाळे लावून कंपन्या फरार होण्याचेही प्रकार यापूर्वी घडल्याने प्रशासनाने अशा कंपन्याकर कारवाई करावी, अशी मागणी आहे.
चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीने या संदर्भात अलिकडेच जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देवून याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मैत्रेय सर्व्हिीसेस प्रा. लिमि., मैत्रेय प्लॉटर्स अँड स्ट्रक्चर प्रा. लिमि., पीएएसएल, साई प्रकाश प्रापर्टीज डेव्हलपमेंट लिमि., कलकम गृप कंपनी, अनोडी कंपनी, समृद्धी जीवन कंपनी, जी-लाईफ कंपनी, जे.एस.व्ही. डेव्हलपर्स इंंडिया लिमि., रोसव्हॅली रियलइस्टेट अँड कन्स्ट्रक्शन कंपनी आणि सिट्रस चिट इन. कंपनी या कंपन्यांसह एच.बी.एन. या कंपन्यांचा नामोल्लेख या तक्रारीत करण्यात आला आहे. या कंपन्या अवैध असून सेबीने (भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड) जाहीर केलेल्या अवैध कंपन्यांच्या यादीमध्ये या कंपन्यांचा समावेश आहे. सेबीने अवैध जाहीर करूनही या कंपन्या मात्र चंद्रपूर जिल्ह्यात व्यवसाय करीतच आहेत. सेबीच्या या इशाऱ्यानंतरही प्रशासनाने या कंपन्यांवर कसलीही कारवाई केली नसल्याबद्दल या निवेदनातून आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.
आर्थिक गुंतवणुकीचा व्यवसाय करण्यापूर्वी कंपन्यांकडे एमसीए प्रमाणपत्र, रिझर्व्ह बँकेचे प्रमाणपत्र, जिल्हा नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक असते. मात्र या कंपन्यांकडे कागदपत्रे आणि प्रमाणपत्र नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)