बॉडी फ्रिजर तत्काळ दुरुस्त
By Admin | Updated: November 8, 2014 00:59 IST2014-11-08T00:59:14+5:302014-11-08T00:59:14+5:30
येथील जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या शवगारात असलेले प्रेत ठेवण्याचे फ्रिजर गेल्या १५ दिवसांपासून बंद आहे. प्रेत दुसरीकडे ...

बॉडी फ्रिजर तत्काळ दुरुस्त
चंद्रपूर : येथील जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या शवगारात असलेले प्रेत ठेवण्याचे फ्रिजर गेल्या १५ दिवसांपासून बंद आहे. प्रेत दुसरीकडे ठेवण्याची व्यवस्था नसल्याने चक्क प्रेत सडण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत गुरुवारी ‘लोकमत’ने ‘अरेरे, रुग्णालयाच्या शवगारात प्रेत सडताहेत’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित करून व्यवस्थापनाचे लक्ष वेधले. लोकमतच्या या वृत्ताची तातडीने दखल घेत बंद पडलेले फ्रिजर शुक्रवारी दुरुस्त करण्यात आले. यामुळे आता तरी प्रेताची होणारी अवहेलना थांबणार आहे.
येथील जिल्हा सामान्य रूग्णालयातील शवविच्छेदनगृहात असलेल्या फ्रिजरमध्ये एकाच वेळी १० मृतदेह ठेवण्याची व्यवस्था आहे. यात, एका कप्प्यात तीन प्रेत मावतील असे दोन कप्प्यांचे एक आणि एकाच कप्प्प्यात एक प्रेत मावेल अशा चार कप्प्यांचा समावेश असलेले अन्य फ्रिजर आहे. मात्र त्यातील सहा प्रेत ठेवण्याचे फ्रिजर गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहे. तर दुसरेही नादुरुस्त आहे. ते ठोकल्याशिवाय सुरूच होत नाही. बरेचदा आपोआप बंद पडून जाते.
गेल्या आठवड्यात चंद्रपुरातील एका युवकाचे प्रेत स्मशानभूमीत बेवारस आढळले होते. ते याच फ्रिजरमध्ये ठेवण्यात आले. तीन दिवसांनी नातेवाईकांनी येऊन प्रेताची ओळख पटविली. मात्र प्रेताची अवस्था पाहण्यापलिकडची होती. नातेवाईकांच्या मते प्रेत ताब्यात घेण्याच्या अवस्थेतही नव्हते. तरीही त्यांनी ताब्यात घेऊन धार्मिक सोपस्कार पार पाडले. असाच प्रकार अनेकदा घडला होता.
दरम्यान, गुरुवारी ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशित करून रुग्णालय व्यवस्थापनासह सर्वांचेच लक्ष वेधले. हे वृत्त प्रकाशित केल्यामुळे अनेकांनी लोकमतचे दूरध्वनीवरून आभारही मानले. रुग्णालय व्यवस्थापनाने याची तत्काळ दखल घेतली. हरीयानावरून फ्रिजर दुरुस्त करणारे तंत्रज्ञ शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास रुग्णालयात पोहचले. बंद पडलेल्या तीन फ्रिजरपैकी दोन फ्रिजर ताबडतोब दुरुस्त करण्यात आले. तिसऱ्या फ्रिजरच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. याबाबत निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम मुनघाटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही याला दुजोरा दिला. फ्रिजरचे नियमित मेंटनन्स केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)