वन व महसूल विभागाचा आंधळा कारभार

By Admin | Updated: February 15, 2016 01:11 IST2016-02-15T01:11:50+5:302016-02-15T01:11:50+5:30

देवाडा खुर्द परिसरातील बोगस पट्टेधारकांचा विषय आता शिगेला जात असून अतिक्रमणधारक ट्रॅक्टरद्वारे अनेक बांबू व झाडे नष्ट करीत असल्याने ....

Blind administration of forest and revenue department | वन व महसूल विभागाचा आंधळा कारभार

वन व महसूल विभागाचा आंधळा कारभार

देवाडा (खुर्द) : देवाडा खुर्द परिसरातील बोगस पट्टेधारकांचा विषय आता शिगेला जात असून अतिक्रमणधारक ट्रॅक्टरद्वारे अनेक बांबू व झाडे नष्ट करीत असल्याने वन व महसूल विभागाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. या प्रकाराला वन व महसूल विभागाचा आंधळा कारभार कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथील काही भाजपा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने आणि वडिलोपार्जित कुठेही अतिक्रमण नसूनसुद्धा केवळ राजकीय बळाचा वापर करुन बनावट कागदपत्राच्या आधारे बोगस पट्टे मिळविले. ग्रामस्थांच्या १०० वर्षांपूर्वीच्या वहिवाटीचा व गुरेढोरे ठेवण्याच्या जागेवर अतिक्रमण करुन त्यातील गुरेढोरे ठेवण्याचे बांबुचे संरक्षण ट्रॅक्टरद्वारे उद्ध्वस्त केल्याने गावात मोठा संघर्ष पेटला आहे. एका बाजूला संपूर्ण गावकरी तर दुसऱ्या बाजूला पाच ते सहा बोगस पट्टेधारक व त्यांना साथ देणारे त्यांचे भाजपाचे पोंभुर्णातील पदाधिकारी अशी फळी तयार झाली आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी करुन यातील भ्रष्ट अधिकारी व अतिक्रमण करणारे बोगस पट्टेधारक यांच्यावर कारवाई करुन ग्रामस्थाच्या हिताची जागा मोकळी करुन देण्यात यावी, यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी तालुक्याचे तहसीलदार, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, पालकमंत्री यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे. परंतु १५ दिवसांचा कालावधी लोटूनसुद्धा या प्रकरणाकडे पाहिजे त्या प्रमाणात संबंधित विभागाने लक्ष दिले नसल्याचे स्थानिक नागरिकांकडून बोलल्या जात आहे.
संबंधित बोगस पट्टेधारक ज्यांचे कधीही तिथे अतिक्रमण नव्हते, ते आताच ट्रॅक्टर लावून त्या ठिकाणातील संपूर्ण झाडेझुडपे साफ करीत आहेत.
त्यांच्या या ठिकाणी यापूर्वी अतिक्रमण असते तर ते इतके वर्षे जागेत जंगल होवू दिले असते काय, असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. एवढे मोठे नुकसान होत असताना संबंधित विभाग यावर पांघरुन टाकून आंधळा का झाला आहे, याबाबत परिसरातील लोकांना आश्चर्य वाटत आहे. या प्रकरणावर तत्काळ आळा घालून ग्रामस्थांची वहिवाटीची जागा मोकळी करुन न दिल्यास ग्रामसवासीयातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे गावकऱ्यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Blind administration of forest and revenue department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.