वरोरा परिसरात आता काळ्या गव्हाची शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 05:00 IST2021-03-11T05:00:00+5:302021-03-11T05:00:41+5:30
काळ्या गव्हाची शेती विदर्भात प्रथमच होत असल्याचे मानले जात आहे.वरोरा शहरानजिकच्या चिनोरा गावातील पांडुरंग डोंगरकर हे आपल्या शेतात नवीन प्रयोग राबवित असतात. त्यांच्या काळ्या गव्हाच्या पोळीचे सेवन केल्यास मनुष्याच्या शरीरात असणाऱ्या अनेक व्याधीवर निर्बंध येत असल्याचे सांगितले जाते. काळा गहू हा पंजाब हरियाणामधील शेतकरी आपल्या शेतात लावत असल्याची माहिती पांडुरंग डोंगरकर यांना मिळाली.

वरोरा परिसरात आता काळ्या गव्हाची शेती
प्रवीण खिरटकर
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : मनुष्याच्या शरिरात अनेक आजारावर मात करण्याची क्षमता काळ्या गव्हामध्ये आहे. आपल्या भागामध्ये काळ्या गव्हाची शेती कुणीही करत नाही. असे असताना वरोरा परिसरातील एका शेतकऱ्याने काळ्या गव्हाची लागवड केली असून प्रथमच चांगले उत्पादन झाले आहे.
काळ्या गव्हाची शेती विदर्भात प्रथमच होत असल्याचे मानले जात आहे.वरोरा शहरानजिकच्या चिनोरा गावातील पांडुरंग डोंगरकर हे आपल्या शेतात नवीन प्रयोग राबवित असतात. त्यांच्या काळ्या गव्हाच्या पोळीचे सेवन केल्यास मनुष्याच्या शरीरात असणाऱ्या अनेक व्याधीवर निर्बंध येत असल्याचे सांगितले जाते. काळा गहू हा पंजाब हरियाणामधील शेतकरी आपल्या शेतात लावत असल्याची माहिती पांडुरंग डोंगरकर यांना मिळाली. आपल्या परिसरातील वातावरणात या गव्हाचे पीक होईल की नाही, ही शंका त्यांना होती. याबाबत त्यांनी दिल्लीवरून १२० रुपये प्रति किलो प्रमाणे २० किलो काळे गहू आणून शेतात लावले.
अर्ध्या एकरात त्यांना जवळपास दहा क्विंटल काळा गहू होत असल्याची माहिती त्यांनी दिली. सध्या काळा गहू परिपक्व झाला असून येत्या एक ते दोन दिवसात त्याची कापणी केली जाणार आहे.
काळ्या गव्हाचे फायदे
काळ्या गव्हाच्या पोळ्या या रोज जेवणात सेवन केल्यास मनुष्याचे तारुण्य टिकवून ठेवण्याचे काम करते. या गव्हात पिवळ्या गव्हाच्या तुलनेत पाच पट लोह असते. ॲनिमिया,मधुमेह, हृदयविकाराचा त्रास असणाऱ्यांनी काळ्या गव्हाच्या पोळ्या सेवन केल्यास बऱ्यापैकी त्रास कमी होतो. बाजारात ८० रुपये प्रति किलो याप्रमाणे हा गहू विकला जातो. कोकणातून एका शेतकऱ्याने त्यांना काळ्या गव्हाच्या बियाण्याची मागणी केली आहे.
काळ्या गव्हामुळे आरोग्य चांगले राहते. अनेक व्याधींचा त्रास कमी होतो. सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा किमतीत काळा गहू आपण विकत असतो. पुढील वर्षी काळ्या गव्हाची लागवड अधिक प्रमाणात करण्याचा मानस आहे.
-पांडुरंग किसन डोंगरकर,
शेतकरी, चिनोरा.