उमलत्या कळींमध्ये पसरतेय काळे विष !
By Admin | Updated: December 1, 2014 22:50 IST2014-12-01T22:50:53+5:302014-12-01T22:50:53+5:30
दिवसामागून दिवस उलटत आहे. पण कोंढा येथील कोळशाची धुळ कमी होण्याऐवजी वाढतच आहे. परिसरातील बालकांच्या शरीरात धुळीचे विष पसरत आहे. एका वर्षाखालील बालकांमध्ये दम्याचा आजार दिसून येत आहे.

उमलत्या कळींमध्ये पसरतेय काळे विष !
सचिन सरपटवार/ गणेश ठमके - कोंढा (भद्रावती)
दिवसामागून दिवस उलटत आहे. पण कोंढा येथील कोळशाची धुळ कमी होण्याऐवजी वाढतच आहे. परिसरातील बालकांच्या शरीरात धुळीचे विष पसरत आहे. एका वर्षाखालील बालकांमध्ये दम्याचा आजार दिसून येत आहे. धुळीच्या प्रदूषणामुळे बालकांमध्ये न्युमोनिया, सर्दी, खोकला व त्वचेचा आजार वाढत आहे. शुद्ध हवेत श्वासोश्वास घेण्याऐवजी चिमूकल्याच्या नाकात कोळशाची धूळ शिरत आहे. त्यामुळे भविष्यात विविध आजारांची शक्यता बळावली आहे.
या उमलत्या कळ्यांची धुळीपासून वेळीच मुक्तता न केल्यास वेळेच्या आधी ‘त्या’ कळ्या कोमजल्या शिवाय राहणार नाही आणि वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्याशिवाय कोंढावासीयांजवळ काहीच उरणार नाही. हे वास्तव आहे कोंढागावचे. ज्या गावात धुळीमुळे बालकांना जगणे कठीण झाले आहे. धुळीमुळे गावातील मत्ते यांच्या दोन महिने वय असलेल्या नातीच्या नाकात धुळीचे खडे जमा झाले होते. तीन वर्षाच्या तन्मय विरुटकर याला त्वचेचा आजार आहे. दोन वर्षाच्या आर्या गोंडेच्या शरीरावर खरुज झाली आहे. १० वर्षाच्या पुजा मंगाम हिला डोळ्याची समस्या निर्माण झाली आहे. १९ वर्षाच्या स्वप्नील ठावरीला धुळीमुळे काळजाशी संगलग्नीत आजार झाला आहे. सुहाना राजुरकर (अडीच वर्ष), आस्टु वरारकर (४), राणी डाखरे (४) धनश्री साखरकर (६), लिना माणूसमारे (९), विशाल मंगाम, रोहीम मंगाम, संजू देवतळे, राधिका माणूसमारे, कुणाल काळे, गणेश खेरे यांना धुळीमुळे सर्दी, पोटदुखी, गळ्यात खसखस, सतत खोकला या आजारांना सामोरे जावे लागले आहे.
कर्नाटका एम्टा कंपनीकडून केल्या जाणाऱ्या प्रदूषणाविरुद्ध कोंढावासीयांच्या मनात तिव्र भावना आहेत. कोंढा फाटा ते चालबर्डीपर्यंतच्या रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावरुन होत असलेल्या कोळसा वाहतुकीमुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याचा सर्वात जास्त परिणाम कोंढा येथील बालकांवर होत आहे.