ही तर विधानसभेतील भाजपाच्या विजयाची नांदी - सुधीर मुनगंटीवार
By Admin | Updated: September 21, 2014 23:49 IST2014-09-21T23:49:06+5:302014-09-21T23:49:06+5:30
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मित्रपक्षांच्या साथीने बाजी मारली. चंद्रपूर जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या

ही तर विधानसभेतील भाजपाच्या विजयाची नांदी - सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मित्रपक्षांच्या साथीने बाजी मारली. चंद्रपूर जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी संध्या गुरनुले तर, उपाध्यक्षपदी कल्पना बोरकर यांची निवड झाली आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेतील हा विजय विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या विजयाची नांदी असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले, विजयाची सुरूवात आज झाली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत मुंबईच्या मंत्रालयावरही झेंडा फडकवू असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. महिलांच्या हाती सत्तेच्या चाब्या दिल्याचे सांगून विकासात भाजपा मागे पडणार नाही. जिल्ह्याचा विकास सक्षमपणे साधू, असेही ते म्हणाले.
२१ सप्टेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होताच भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार, खासदार हंसराज अहीर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल देशकर, आमदार नाना शामकुळे यांनी पदाधिकाऱ्यांसह नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचे स्वागत केले. यावेळी भाजपाचे चंद्रपूर महानगर अध्यक्ष विजय राऊत, जिल्हा परिषदेचे गटनेते देवराव भोंगळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुमरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप करपे, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेणुका दुधे, सरचिटणीस अंजली घोटेकर, मूलच्या नगराध्यक्षा रिना थेरकर, उपाध्यक्ष प्रविण मोहूर्ले, माजी सभापती रेखा गद्देवार, मूल पंचायत समितीचे उपसभापती वलकेवार, मारगोनवार, नंदु रणदिवे, गोरंटीवार आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)