वैद्यकीय महाविद्यालय रोखण्यामागे भाजपाचेच संगनमत
By Admin | Updated: June 21, 2015 01:48 IST2015-06-21T01:48:20+5:302015-06-21T01:48:20+5:30
राज्यातील सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसह चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रोखण्यामागे भाजपाचेच संगणमत आहे.

वैद्यकीय महाविद्यालय रोखण्यामागे भाजपाचेच संगनमत
चंद्रपूर : राज्यातील सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसह चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रोखण्यामागे भाजपाचेच संगणमत आहे. ज्या जनतेने विश्वासाने सत्ता सोपविली त्या जनतेशी झालेला हा प्रचंड विश्वासघात आहे, अशी बोचरी टीका काँग्रेसचे नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेत केली.
चंद्रपुरातील वैद्यकीय महाविद्यालयांसह राज्यातील सहा वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रोखल्याच्या निषेधार्थ एनएसयूआयने शनिवारी एक दिवसाचा धरणा स्थानिक गांधी चौकात दिला. त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत पुगलिया यांनी ही टीका केली.
पुगलिया म्हणाले, प्रत्यक्षात या सर्व महाविद्यालयांच्या स्थापनेचा मार्ग मोकळा होता. महाविद्यालये सुरु करण्याची पूर्ण तयारीही झाली होती. राज्यातील ६०० विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधेसोबतच राज्यातील हजारो जनतेला मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधेचाही हा मानविय विषय होता. मात्र भाजपाच्या नेत्यांनी यात राजकारण आणले. त्यातूनच ही सर्व महाविद्यालये रद्द झाली आहेत. केवळ महाराष्टातीलच नाही तर देशातील ६६ महाविद्यालयांची परवानगी रद्द झाली, असे भाजपाची मंडळी आपल्या खुलाश्यात सांगत आहेत. हे वक्तव्य ही मंडळी कितपत गंभीरपणे करीत असतील, याचा विचार जनता करणारच आहे. या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून विनंती केल्याचे सांगून पुगलिया म्हणाले, त्यांना आपण हस्तक्षेपाची विनंती केली आहे. मात्र ते किती प्रतिसाद देतील, याबद्दल शंकाच आहे.
हा लढा जनतेच्या हक्काचा आणि आरोग्यचा आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने आणि न्यायालयीन लढ्याने आपण तो लढू. या संदर्भात गडचिरोलीतील मंडळी न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. सोमवारी याच प्रश्नावर बल्लारपुरातील नागरिक आणि काँग्रेसची मंडळी एक दिवसीय धरणा देऊन आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.(जिल्हा प्रतिनिधी)