आकाश चौधरी गोंडपिपरी जि.प. व पं.स. च्या आज झालेल्या मतमोजणीत भाजपाने दणदणीत विजय मिळविला आहे. पंचायत समितीसाठी ६ तर जि.प. साठी ३ उमेदवार भाजपाने निवडून आणत एकहाती सत्ता मिळविली आहे. गोंडपिपरी तालुक्याच्या या ऐतिहासिक निकालाने चक्क पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फळकणार आहे. या निवडणुकीच्या निकालाने काँग्रेसला गोंडपिपरी तालुक्यात जबर धक्का बसला आहे.गोंडपिपरी तालुक्यातील तीन जिल्हा परिषद व सहा पंचायत समिती गणासाठी क्रीडा संकुलात मतमोजणी करण्यात आली. या निकालाने अनेक जणांना फटका बसला. या निवडणुकीत भाजपाने काँग्रेसला खाताही खोलू दिला नाही. या निवडणुकीसाठी आजी-माजी आमदारांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र आमदार सुभाष धोटे यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. भाजपाने चक्क जिल्हा परिषदेच्या तीन व पंचायत समितीचे सहाही उमेदवार विजयी झाले. यात करंजी धानापूर जिल्हा परिषद क्षेत्राच्या भाजपाच्या उमेदवार स्वाती वडपल्लीवार यांनी काँग्रेसच्या सुरेखा निमगडे यांचा पराभव करत ४९३८ मतांनी निवडून आल्या. तर धाबा-तोहोगाव जिल्हा परिषद क्षेत्रात पार्सल विरूद्ध नारा चांगलाच गाजला आणि भाजपच्या पार्सल उमेदवार वैष्णवी बोडलावारच ७१३३ मते घेत काँग्रेसच्या माधुरी सातपुते यांचा २५३३ मतांनी पराभव केला. विठ्ठलवाडा भं. तळोधी गटात अपक्ष उमेदवार सपना अवथरे यांनी भाजपच्या कल्पना अवथरे यांना चांगलीच टक्कर दिली. मात्र भाजपच्या कल्पना अवथरे यांनी अपक्ष सपना अवथरे यांचा ४८० मताची आघाडी घेत पराभव केला. करंजी पंचायत समिती गणासाठी भाजपच्या भूमी पिपरे यांनी संघटनेच्या रोहिनी कवठे यांचा ४० मतांनी पराभव करत विजय मिळविला. तर काँग्रेसच्या दिपाली कुनघाडकर यांना १२४२ मतावरच समाधान मानावे लागले. धानापूर गणात भाजपचे मनिष वासमवार यांनी २६३८ मते मिळवित काँग्रेसचे प्रविण कांबळे यांचा ६७१ मतांनी पराभव केला. विठ्ठलवाडा गणाच्या भाजपच्या उमेदवार कुसुम ढुमने यांनी २५११ मते घेत काँग्रेसच्या लताबाई पिंपळकर ७३३ मतांनी पराभव केला. भंगाराम तळोधी गणात भाजपच्या सुनिता येग्गेवार यांना ३०९० मते मिळाली तर काँग्रेसच्या संगिता झाडे यांना २२४३ मते मिळाल्याने भाजपच्या सुनिता येग्गेवार यांनी बाजी मारली.
गोंडपिपरीत भाजपचा ऐतिहासिक विजय
By admin | Updated: February 24, 2017 01:20 IST