गरीबांना वीज बिल माफीसाठी भाजप रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 05:01 IST2020-07-18T05:00:00+5:302020-07-18T05:01:16+5:30
२२ मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाले. या काळात गोरगरीब जनता आर्थिक संकटात सापडली. १ एप्रिलपासून या सरकारने वीज दरात वाढ करत जनतेशी बेईमानी केली. ०-१०० या स्लॅब मध्येसुद्धा वाढ करत राज्यातील जनतेवर अन्याय केला. लॉकडाऊनच्या काळातील गरीबांची वीज बिले माफ करावी, या मागणीसाठी आम्ही या आंदोलनाचा शंखनाद केला आहे. हा आंदोनलाचा पहिला टप्पा आहे.

गरीबांना वीज बिल माफीसाठी भाजप रस्त्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लॉकडाऊन कालावधीतील गरीबांची वीज बिले माफ करा या मागणीसाठी चंद्रपूर जिल्ह्यात भाजप रस्त्यावर उतरली. काही ठिकाणी वीज बिलाची होळी केली, तर काही ठिकाणी राज्य शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. बल्लापुरात निषेध नोंदविताना माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गरीबांचे वीज बिल माफ झाले नाहीत तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.
२२ मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाले. या काळात गोरगरीब जनता आर्थिक संकटात सापडली. १ एप्रिलपासून या सरकारने वीज दरात वाढ करत जनतेशी बेईमानी केली. ०-१०० या स्लॅब मध्येसुद्धा वाढ करत राज्यातील जनतेवर अन्याय केला. लॉकडाऊनच्या काळातील गरीबांची वीज बिले माफ करावी, या मागणीसाठी आम्ही या आंदोलनाचा शंखनाद केला आहे. हा आंदोनलाचा पहिला टप्पा आहे. गरिबांच्या वीज बिलासाठी या सरकारजवळ पैसे नाहीत, आरोग्य सुविधांसाठी पैसे नाहीत, ज्यांच्या जवळ रेशन कार्ड नाहीत त्यांना धान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मात्र राज्य सरकारने यासाठी काहीच केले नाही, असा आरोपही यावेळी मुनगंटीवार यांनी केला. भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, नगराध्यक्ष हरिश शर्मा, चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, रेणुका दुधे, काशिसिंह, मनीष पांडे, निलेश खरबडे, अजय दुबे, शिवचंद द्विवेदी, राजु गुंडेट्टी, मिना चौधरी, राजू दारी, कनकम कुमार, समीर केने, आशिष देवतळे, बुचय्या कंदीवार उपस्थित होते. आंदोलनात भाजपाचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते सोशल डिस्टंसिंग पाळून सहभागी झाले होते.
चिमूर व तळोधी (बा.) येथे आ. कीर्तीकुमार भांगडिया यांच्या नेतृत्वात, ब्रह्मपुरी येथे माजी आमदार प्रा. अतुल देशकर, मूल येथे जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले, घुग्घुस येथे भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, राजुरा तालुक्यातील विहिरगाव येथे विदर्भ राज्य समितीच्यावतीने माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.