पोंभुर्ण्यात भाजपा; सावलीत काँग्रेस
By Admin | Updated: November 3, 2015 00:14 IST2015-11-03T00:14:45+5:302015-11-03T00:14:45+5:30
चिमूर नगर परिषद आणि सावली व पोंभुर्णा नगर पंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी मतमोजणीनंतर जाहीर करण्यात आला.

पोंभुर्ण्यात भाजपा; सावलीत काँग्रेस
नगर पंचायतीचा निकाल : चिमूर नगरपालिका निवडणुकीत संमिश्र कौल
चंद्रपूर : चिमूर नगर परिषद आणि सावली व पोंभुर्णा नगर पंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी मतमोजणीनंतर जाहीर करण्यात आला. चिमूर नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी संमिश्र कौल दिला आहे. सावली नगरपंचायतीत काँग्रेसने १७ पैकी १० जागांवर विजय मिळवित सत्तेचा मार्ग मोकळा केला आहे तर पोंभुर्णा नगरपंचायतीत भाजपाने १७ पैकी १० जागा पटकावित आपला झेंडा रोवला आहे.
अखेर काँग्रेसने रोवला झेंडा
सावली : अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या सावली नगर पंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मतदारांनी बहुमताचा कौल दिला. त्यात काँग्रेसचे दहा उमेदवार निवडून आले. आमदार विजय वडेट्टीवार यांनी या निवडणुकीत विशेष लक्ष घातले होते. त्यांनी केलेल्या विकासकामांना मतदारांनीही स्वीकारत काँग्रेसला बहुमतात निवडून दिले. राष्ट्रवादी काँग्रेसला पाच जागावर समाधान मानावे लागले. बसपा एक तर अपक्ष एक अशा प्रकारे उमेदवार निवडून आले तर भाजपाच्या खात्यातील एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. त्यामुळे सावली नगरपंचायतीत भाजपाचे पाणीपत झाले आहे.
सावली यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा. मात्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी या क्षेत्रात विकासामाचा धडाका सुरू केला. अखेर सावली- ब्रह्मपुरी क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी मतदारांना केलेल्या आवाहनानुसार त्यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून १७ पैकी तब्बल १० उमेदवार निवडून दिले आहेत. त्यामुळे काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. प्रभाग क्रमांक १ संगिता प्रितम गेडाम बसपा (१५१), प्रभाग क्र.२ विनोद भगवान वाळके काँग्रेस (१५०), प्रभाग क्र. ३ सेविंद्र विठ्ठल मडावी काँग्रेस (१६४), प्रभाग क्र. ४ चंद्रकांत नानाजी संतोषवार अपक्ष (१२९), प्रभाग क्र. ५ रजनी राजेश्वर भडके काँग्रेस (१४५), प्रभाग क्र. ६ विजय बापु सातरे राकाँ (८२), प्रभाग क्र. ७ छत्रपती आनंदराव गेडाम काँग्रेस (१२४), प्रभाग क्र. ८ शिला काशीनाथ शिंदे काँग्रेस (१२२), प्रभाग क्र. ९ निलम निखील सुरमवार राकाँ (१५३), प्रभाग क्र. १० अंशु नितीन दुवावार काँग्रेस (१३६), प्रभाग क्र. ११ साधना ईश्वर वाढई काँग्रेस (१८५), प्रभाग क्र. १२ नरेंद्र रामभाऊ सुरमवार राकाँ (१३२), प्रभाग क्र. १३ भोगेश्वर केवश मोहुर्ले काँग्रेस (१३५), प्रभाग क्र. १४ कुसूम शंकर रस्से राकाँ (११४), प्रभाग क्र. १५ योगिता अनिल बुगदलवार काँग्रेस (१८३), प्रभाग क्र. १६ विलास त्र्यंबक यासलवार काँग्रेस (१२३), प्रभाग क्र. १७ तृप्ती सचिन संगीडवार राकाँ (१७०) अशा प्रकारे उमेदवार निवडून आले आहेत.
यापैकी सेवींद्र मडावी, साधना वाढई व रजनी भडके यांनी तीन वेळा निवडून येण्याचा मान मिळविला आहे. तर चंद्रकांत संतोषवार दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. इतर सर्व उमेदवार पहिल्यांदाच निवडून आले आहेत. त्यामुळे नगरवासीयांनी पहिल्या नव्या नगर पंचायतीत नव्या उमेदवारांना संधी दिली आहे.
चिमुरात सत्तेची चावी अपक्षांच्या हातात
खडसंगी : नवनिर्मित चिमूर नगरपरिषद निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. आज सोमवारी तहसील कार्यालयाच्या राजीव गांधी सभागृहात सकाळी १०.१५ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास निकाल जाहीर करण्यात आला. यात चिमूरकरानी कोणत्या एका पक्षाला सत्ता न देता समिश्र कौल देत जणू अपक्षाच्या हातात सत्तेची चावी दिली आहे.
चिमूर नगरपरिषदेमध्ये १९ हजार ६५३ मतदार असून ७५.८९ टक्के मतदान झाले होते. ७५.८९ टक्के मतदान करणाऱ्या मतदारांनी समिश्र कौल दिला. त्यामध्ये भाजपाला सहा जागेवर विजय संपादन करता आला. काँग्रेस पाच, शिवसेना दोन तर स्वपक्षाने तिकीट नाकारल्याने बंडाळी करणाऱ्या चार अपक्षांना मतदारांनी सभागृहात पाठविले आहे.
भाजपाच्या विजयी उमेदवारामध्ये प्रभाग क्रमांक १ मधून छाया कंचर्लावार, प्रभाग ४ मध्ये उषा सुरेश हिवरकर, प्रभाग क्रमांक ७ मध्ये हेमलता नन्नावरे, तसेच प्रभाग ८ मध्ये भारती अमोल गोडे, प्रभाग १३ मध्ये शिल्पा समितर राचलवार, प्रभाग क्रमांक १५ मध्ये नितीन शांताराम कटारे हे भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
काँग्रेस पक्षाने १७ प्रभागातही उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यापैकी पाच उमेदवार विजयी झालेत. त्यामध्ये प्रभाग क्रमांक २ मध्ये गोपाल झाडे, प्रभाग क्रमांक ५ मध्ये अब्दुल कदीर शेख, प्रभाग क्रमांक ११ मध्ये श्रद्धा प्रदीप बंडे, प्रभाग १२ मध्ये कल्पाना विठ्ठल इंदूरकर, प्रभाग १७ मध्ये अॅड. अरुण दुधनकर विजयी झाले.
शिवसेनेने तालुका प्रमुख गजानन बुटले यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविली. बऱ्याच वर्षापासून राजकारण करणाऱ्या गजानन बुटले यांना सत्तेने हुलकावणी दिली. मात्र त्यांच्या धर्मपत्नी सीमा गजानन बुटले यांना नागरिकांना सभागृहात पाठविले तर दुसरे उमेदवार उमेश हिंगे हे प्रभाग क्रमांक ९ मधून विजयी झाले आहेत.
काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारल्याने पक्षाविरुद्ध बंडखोरी करीत नशीब अजमावणारेअपक्ष उमेदवार तुषार शिंदे प्रभाग क्रमांक ३ मधून, तुषार काळे प्रभाग क्रमांक १४ मधून, जयश्री निवटे प्रभाग क्रमांक १६ मधून तर सतिश जाधव हे प्रभाग क्रमांक १० मधून विजयी झाले आहेत.
१७ सदस्यीय नगर परिषदेमध्ये चिमूर येथील मतदारांनी कोणत्याच पक्षाला बहुमत न दिल्याने अपक्षाच्या हातात सत्तेचा चाब्या देत त्रिशंकु स्थिती निर्माण झाली आहे. केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आहे. चिमूरमध्ये भाजपाचे आमदार किर्तीकुमार भागंडिया यांच्या नेतृत्वात निवडणुक लढविली. मात्र सत्ताधारी भाजपालाही मतदारांनी सत्तेपासून दूर ठेवले आहे. तर काँग्रेसचे ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर, सतिश वारजुकर यांच्या नेतृत्वात चिमूर नगरपरिषदेवर काँग्रेसला गेलेला जनाधार परत मिळविण्यात यश आले आहे.
भाजपाने सत्ता कायम ठेवली
पोंभुर्णा : पोंभुर्णा नगरपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून त्यात १७ पैकी भाजपाला १० जागांवर निवडून देऊन मतदारांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विकासकामाची पावतीच दिली आहे. काँग्रेस पाच तर दोन अपक्ष उमेदवार निवडून आले. यामध्ये काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पद्मगिरीवार व भाजपाचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंगळगिरीवार व शिवसेना तालुका अध्यक्ष गणेश वासलवार यांचा पराभव झाला.
१७ सदस्यीय असलेल्या पोंभुर्णा नगर पंचायतीसाठी १ नोव्हेंबरला निवडणूक घेण्यात आली. त्यासाठी १७ मतदान केंद्रावर मतदारांनी निवडणुकीचा हक्क बजावला. निवडणुकीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. यामध्ये काँग्रेस- भाजपा-शिवसेना अशी तिहेरी लढत होण्याचे संकेत होते. परंतु सोमवारी घोषित करण्यात आलेल्या निवडणुकीच्या निकालावरुन येथील अनेकांना धक्का बसला असून शिवसेना व बसपा याठिकाणी हद्दपार झाली आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निवडून आल्यानंतरही मतदारांकडे लक्ष ठेवले आहे. त्यांच्या समस्यांचा निपटारा व विकासकामांचा झंझावात कायम ठेवला आहे. त्यामुळे मतदारांनी त्यांच्या नेतृत्वावरच विश्वास ठेवला. त्यामुळे भाजपाने आपली सत्ता कायम ठेवली असून त्यांना १० जागा जिंकण्यात यश मिळाले तर काँग्रेसला मात्र पाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. आणि माळी समाजातील दोन अपक्ष उमेदवारांनी विजयाची माळ आपल्या गळ्यात घातली आहे.
विजयी उमेदवारांमध्ये प्रभाग क्रं. १ पुष्पा बुरांडे (भाजपा), प्रभाग क्र. २ किशोर कावळे (अपक्ष) प्रभाग ३ सविता अशोक गेडाम (काँग्रेस), प्रभाग क्र. ४ श्वेता महेंद्र वनकर (भाजपा) , प्रभाग क्र. ५ जयपाल कालीदास गेडाम (काँग्रेस), प्रभाग क्र. ६ शारदा उद्धव कोडापे (भाजपा), प्रभाग क्र. ७ विजय दशरथ कस्तुरे (भाजपा), प्रभाग क्र. ८ कल्पना लक्ष्मण गुरुनुले (अपक्ष) प्रभाग क्र. ९ ईश्वर बुधाजी नैताम (भाजपा), प्रभाग १० मोहन दुर्योधन चलाख (भाजपा), प्रभाग ११ रजीया परवीण इकबाल कुरेशी (भाजपा), प्रभाग क्र. १२ माधुरी विनोद चांदेकर (काँग्रेस), प्रभाग क्र. १३ अमर बोनीसिंह बघेल (काँग्रेस), प्रभाग क्र. १४ अतिक अहमद कुरेशी (काँग्रेस), प्रभाग क्र. १५ सुनिता दिलीप मॅकलवार (भाजपा), प्रभाग क्र. १६ नेहा नरेंद्रसिंह बघेल (भाजपा), प्रभाग १७ गजानन पोचन्ना गोरंटीवार (भाजपा) आदी उमेदवार विजयी झाले. विशेष म्हणजे, या निवडणुकीमध्ये काँग्रेस तालुका अध्यक्ष व शिवसेना तालुका अध्यक्ष आणि भाजपाचे दिग्गज उमेदवार पराभूत झाल्याने त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्याना या निवडणुकीचा मोठा धक्का बसला आहे.निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कल्पना निळ होत्या. (लोकमत चमू)
चिमुरात झाली चुरशीची लढत
महात्मा फुले यांच्या वंशज नीता होले या पोंभूर्णा येथे भाजपाच्या प्रचारासाठी आल्या होत्या. त्याला कारणही तसेच आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महात्मा फुले यांच्या वंशजांना शासकीय नोकरी मिळवून दिली. महात्मा फुलेंच्या मूळ गावातील भिलेवाड्याच्या नुतनीकरणासाठी स्वत: पाठपुरावा केला होता. एवढेच नव्हे तर पुणे विद्यापीठाला महात्मा फुलेंचे नाव द्यावे, यासाठीही प्रयत्न केले होते. आता सावित्रीबाई फुलेंचे स्मारकही विद्यापिठात उभारण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. पालकमंत्र्यांच्या या स्रेहाखातर निता होले या पोंभूर्णात प्रचाराला आल्या होत्या आणि त्याचा मतदारांवर प्रभावही पडला.
मंत्रिपद मिळाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी विकासकामाचा जो धडाका लावला, त्यामुळे मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे स्वत: प्रभावित झाले. याचमुळे ठाकरे यांनी कल्याणच्या सभेत सुधीर मुनगंटीवारांबद्दल ‘काम करणारा व सामान्यांसाठी झिजणारा नेता’ असे उल्लेख केला होता. त्यांच्या अशा कामांमुळे राज ठाकरेसारख्या मोठ्या राजकीय नेत्यासह सामान्य माणूसही किती प्रभावित आहे, हे पोंभूर्णातील निवडणुकीत दिसून आले.
वडेट्टीवारांची चमक
सावली नगर पंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या कामगिरीची चमक दिसली. भाजपाचा पार सफाया करून त्यांच्या नेतृत्तातील पक्षाने येथे निर्विवाद बहुमत मिळविले. राष्ट्रवादी काँंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांचा सावली हा बालेकिल्ला असला तरी स्वत:च्या तालुक्यातच गड्डमवारांचा टिकाव लागला नाही. भाजपाला तर खातेही उघडता आले नाही.
सावलीत बसला विद्यमानांना फटका
सावली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच व भाजपाचे उमेदवार अतुल लेनगुरे यांना मात्र यावेळी पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र सुमवार यांनी अवघ्या आठ मतांनी त्यांचा पराभव केला.