विकासाभिमुख सरकार देण्याची क्षमता भाजपातच: सुधीर मुनगंटीवार
By Admin | Updated: September 27, 2014 23:12 IST2014-09-27T23:12:44+5:302014-09-27T23:12:44+5:30
विकासाभिमुख सरकार देण्याची क्षमता केवळ भाजपातच आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने १०० दिवसांत केलेली लोकाभिमुख कामगिरी जनतेने बघितली आहे. त्यामुळे येत्या

विकासाभिमुख सरकार देण्याची क्षमता भाजपातच: सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर : विकासाभिमुख सरकार देण्याची क्षमता केवळ भाजपातच आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने १०० दिवसांत केलेली लोकाभिमुख कामगिरी जनतेने बघितली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपा व मित्र पक्षांच्या युतीला पूर्ण बहुमत मिळेल, असा विश्वास भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
गेली १५ वर्षे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमुळे हे राज्य कोमात गेले होते, अशी टीकाही त्यांनी केली. लोकांची कामे होत नव्हती. अनेक समस्यांचा डोंगर राज्यात उभा झाला. कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून दररोज होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वाढती बेरोजगारी वाढता नक्षलवाद, कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू, महिलांवर दिवसाढवळ्या होणारे अत्याचार अशी समस्यांची मोठी मालिकाच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने तयार केली. जनता आता कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला कंटाळली आहे. जनतेशी संवाद साधणारे, लोकांची कामे करणारे सरकार लोकांना हवे आहे, असेही ते म्हणाले.
मतदार संघ पुनर्रचनेनंतर २००९ च्या विधानसभा निवडणुकीत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रासाठी मी नवीन होतो. या मतदार संघातील नागरिकांनी प्रेम व विश्वास दाखवत मला प्रचंड बहुमताचा कौल दिला. गेल्या पाच वर्षांत विविध विकासाची कामे मी या विधानसभा मतदार संघात पूर्णत्वास आणली. विविध सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. विरोधी पक्षाचा आमदार असतानाही मतदार संघासाठी विविध माध्यमातून निधी खेचून आणला. त्याद्वारे मतदार संघात कोट्यवधीची विकास कामे पूर्णत्वास आणल्याचेही त्यांनी सांगितले. बल्लारपूर येथे उपविभागीय कार्यालयाची निर्मिती, मूल येथे माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा.सा.कन्नमवार यांचे स्मारक व सभागृह, बल्लारपूर शहरात चार कोटी रुपये किमतीच्या नाट्यगृहाला मंजुरी, मूल नगरपरिषदेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शहरातील रस्ते बांधणीसाठी १० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर, मूल, बल्लारपूर, पोंभुर्णा या ठिकाणी वाचनालयांची निर्मीती आदि कामे केली. (प्रतिनिधी)