काळा पैसा उघडकीस आणण्यात केंद्रातील भाजप सरकार अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2017 00:37 IST2017-01-03T00:37:53+5:302017-01-03T00:37:53+5:30
देशातून काळा पैसा आणि भ्रष्टाचार संपुष्टात आणण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

काळा पैसा उघडकीस आणण्यात केंद्रातील भाजप सरकार अपयशी
काँग्रेसची टीका : ६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन
चंद्रपूर : देशातून काळा पैसा आणि भ्रष्टाचार संपुष्टात आणण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी ५० दिवसांमध्ये देशातील काळा पैसा बाहेर काढण्याचे आश्वासन दिले होते. परंतु या निर्णयाला ५० दिवस पूर्ण झाल्यानंतरही सरकार आतापर्यंत काळा पैसा उघडकीस आणू शकलेले नाही. सरकारचा नोटबंदीच घेतलेला निर्णय चुकीचा सिद्ध झाला, असा आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे निरीक्षक प्रकाश राठोड यांनी सोमवारी येथे केला.
चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकपूर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये प्रकाश राठोड आणि विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश राठोड म्हणाले की, नोटबंदीमध्ये भाजप सरकार अपयशी ठरले आहे. त्याच वेळी शेतकरी आणि सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या ५० दिवसांमध्ये सामान्य लोकांचे बँकांमध्ये १४ लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. नोटबंदीनंतरही काळा पैसा बाहेर येऊ शकलेला नाही. जनविरोधी निर्णय घेऊन मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सरकारच्या या चुकीच्या धोरणाचा विरोध करण्यासाठी काँग्रेसतर्फे संपूर्ण देशासह चंद्रपूर जिल्ह्यात ६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन केले जाणार आहे.े महागाईविरोधात ९ जानेवारी रोजी चंद्रपूर येथे महिलांचे घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे, अशी माहितीही राठोड यांनी दिली.
यावेळी आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशात नोटबंदीनंतर नोटांची टंचाई निर्माण झाली. ती लक्षात घेऊन मोदी सरकार कॅशलेस व्यवहार करण्याचा राग गात आहे. परंतु भाजप सरकारची ही योजनादेखील अपशयी ठरत आहेत. राज्यातील ४१ हजार गावांमध्ये बँक नाहीत आणि शेतकऱ्यांची बँकेत जमा ठेवही नाही. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसेच नसल्याने ते कॅशलेस व्यवहार कसे करू शकतात? शहरी भागातील अनेक एटीएममध्ये पैसे नाहीत. मोदी सरकारच्या ५० दिवसांच्या निर्णयानंतरही त्यात कोणताही बदल झालेला नाही.
पत्रकार परिषदेला माजी आमदार सुभाष धोटे, जिल्हा कांग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे, आसावरी देवतळे, माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर, काँग्रेस महानगराध्यक्ष नंदू नागरकर व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणनकर यांच्यासह कांग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)