भाजपा आघाडीची आगेकूच ?

By Admin | Updated: September 20, 2014 23:46 IST2014-09-20T23:46:22+5:302014-09-20T23:46:22+5:30

अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सत्तास्थापनेच्या या खेळात भाजपा आणि काँंग्रेस हे दोघेही गुंतले असले तरी

BJP front ahead? | भाजपा आघाडीची आगेकूच ?

भाजपा आघाडीची आगेकूच ?

मिनी मंत्रालयाचा राजरंग : राकॉला बाहेर ठेवून भाजपा साधणार डाव ?
चंद्रपूर : अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सत्तास्थापनेच्या या खेळात भाजपा आणि काँंग्रेस हे दोघेही गुंतले असले तरी २९ चे संख्याबळ जुळविताना आणि ते सभागृहात टिकवून ठवताना सर्वाचीच धावाधाव सुरू आहे.
५७ सदस्यसंख्या असलेल्या चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसकडे २१ तर भाजपाकडे १८ सदस्य आहेत. अर्थात निवडणुकीतील सुत्रेही या दोन्ही पक्षांकडेच आली आहेत. राष्ट्रवादीकडे ७ सदस्य असूनही ओबीसी प्रवर्गातील सदस्य नसल्याने उपाध्यक्षपदाचीच अपेक्षा त्यांना आहे. या निवडणुकीत काँग्रेस-राकाँची आघाडी होण्याची शक्यता असून या दोन्ही पक्षातील नेते या निवडणुकीत जवळ आले आहेत. असे असूनही हे संख्याबळ २९ वर पोहचत नाही. पुन्हा दोन सदस्य आपल्या तंबुत दाखवा, तरच विजयाची हमी बाळगू, असा आग्रह राकॉकडून सुरू आहे. काँग्रेसने अन्य पक्षातील चार सदस्य आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला असला तरी राकॉ यावर विश्वास ठेवायला तयार नाही. या बेबनावामुळे सभागृहात नेमके काय घडेल, हे सांगता येत नाही.
राष्ट्रवादीने आपले सातही सदस्य रिमोटमध्ये असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सदस्यांची बैठक रात्री उशिरा नागपुरात होत आहे.
चित्रा डांगे आणि ज्योती जयस्वाल ही नावे काँग्रसमध्ये चर्चेत असली तरी अद्याप उघडपणे सांगण्यात आलेली नाहीत. सहा वाहनातून सहलीसाठी निघालेले काँग्रेसचे सर्वच सदस्य एकत्र असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत असले तरी एक वाहन युवाशक्तीच्या गावाकडे भरकटल्याच्या वृत्ताने आघाडीचा रक्तदाब वाढला आहे.
या दोघांची आघाडी झाली तरी एका सदस्याची गरज पडणार आहे. त्यासाठी चार सदस्य संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी केला आहे. अध्यक्षपद आणि दोन सभापतीपदे काँग्रेसने ठेवून उपाध्यक्षपद आणि एक सभापतीपद मिळावे अशी अपेक्षा राष्ट्रवादीची आहे.
या चढाओढीत भाजपा पुढे असल्याचे संकेत आहे. शिवसेना, मनसे, बसपा आणि युवा शक्ती असे मिळून २९ चे संख्याबळ आपल्याकडे असल्याचा दावा भाजपाचा आहे. एवढेच नाही तर काँग्रेसमधील चार सदस्यही आपल्या वाटेने असल्याचे या गोटातून सांगितले जात आहे. संध्या गुरुनुले आणि कल्पना बोरकर यांची नावे भाजपाकडून अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.
गेल्या टर्ममध्ये हे बहुतेक पक्ष भाजपासोबत असल्याने या वेळीही सभागृहात मदत मिळेलच, असा विश्वास भाजपाला वाटत आहे. असे असले तरी केवळ एक मत निर्णायक ठरणार असल्याने या मताकडे दोन्हीकडील नेत्यांच्या नजरा लागल्या आहेत. उपाध्यक्षपदाची निवडणुकही सोबतच होत आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील निकालावर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: BJP front ahead?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.