भाजपा उमेदवाराची शिवसेना उमेदवारास मारहाण
By Admin | Updated: February 17, 2017 00:52 IST2017-02-17T00:52:01+5:302017-02-17T00:52:01+5:30
पैसे वाटण्यास विरोध केला म्हणून भाजपाच्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप शिवसेना उमेदवाराने केला आहे.

भाजपा उमेदवाराची शिवसेना उमेदवारास मारहाण
नागभीड : पैसे वाटण्यास विरोध केला म्हणून भाजपाच्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप शिवसेना उमेदवाराने केला आहे. या उमेदवाराच्या तक्रारीवरून नागभीड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नागभीड तालुक्यातील पारडी-बाळापूर गटातील हा प्रकार आहे. येथे भाजपकडून संजय गजपुरे रिंगणात आहेत. तर सरिता जयस्वाल शिवसेनेच्या उमेदवार आहेत. मिंडाळा येथे प्रचारादरम्यान संजय गजपुरे हे पैशाचे वाटप करीत असल्याची माहिती जयस्वाल यांना मिळाली. त्या ठिकाणी जयस्वाल गेल्या. गजपुरे व त्यांच्या समर्थकांनी जयस्वाल यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.
जयस्वाल यांच्या तक्रारीवरून नागभीड पोलिसानी संजय गजपुरे, अशोक समर्थ, सतीश मांदाडे व विनोद हजारे यांचेविरूद्ध भादंविच्या कलम २९४, ३२४, १४३, १४७, १४८, १३५ या अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
मी एक सुसंस्कृत माणूस आहे. गेली २५ वर्ष सार्वजनिक जीवनात आहे. मी महिलांचा आदर करतो. असे कृत्य माझ्याकडून शक्य नाही. शिवसेना उमेदवार सुरूवातीला भाजपकडे तिकीट मागत होत्या. त्यांना पक्षाचे तिकीट नाकारले. म्हणून केवळ द्वेष भावनेतून त्यांनी तक्रार दिली आहे.
- संजय गजपुरे, उमेदवार,
पारडी बाळापूर क्षेत्र