विद्यार्थ्यांच्या वाढदिवशी होते पुस्तकाचे दान!

By Admin | Updated: December 22, 2014 22:43 IST2014-12-22T22:43:53+5:302014-12-22T22:43:53+5:30

वाढदिवस म्हटला की, नवीन कपडे, केक, फुगे, झगमगाट मित्रांसोबत पार्टी असे काहीसे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. हे चित्र नसून अशी जणू काही प्रथाच आता सुरु झाली आहे. शाळा, महाविद्यालयातील चिमूकलेही

Birthday of the students was a book! | विद्यार्थ्यांच्या वाढदिवशी होते पुस्तकाचे दान!

विद्यार्थ्यांच्या वाढदिवशी होते पुस्तकाचे दान!

साईनाथ कुचनकार - चंद्रपूर
वाढदिवस म्हटला की, नवीन कपडे, केक, फुगे, झगमगाट मित्रांसोबत पार्टी असे काहीसे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. हे चित्र नसून अशी जणू काही प्रथाच आता सुरु झाली आहे. शाळा, महाविद्यालयातील चिमूकलेही यात मागे नाही. किमान केक आणि चॉकलेट तरी वर्गामध्ये दिल्याच जातो. यात काहींना आनंद मिळत असला तरी गरीब विद्यार्थ्यांचे काय, असा प्रश्न पडतो. यावर मात करण्यासाठी येथून जवळच असलेल्या स्व. गोपाळराव वानखेडे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाने अनोखा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना समाधान मिळत असून अवाढव्य खर्चातही बचत होत आहे. या उपक्रमाचे ग्रामस्थांनीच नाही तर जिल्हा परिषद शिक्षण विभागानेही कौतुक केले आहे. असाच उपक्रम अन्य शाळांतील विद्यार्थ्यांनीही राबविल्यास एक वेगळी प्रथा जिल्ह्यात निर्माण होऊ शकते.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृती रुजविणे गरजेचे आहे. यासाठी सुसज्ज ग्रंथालय असणे गरजेचे आहे. ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागते. विद्यार्थ्यांना पुस्तकाबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी खरेदी केलेले पुस्तक शाळेच्या वाचनालयात देण्याची योजना येथील मुख्याध्यापक नरेंद्र बोबडे यांनी साकारली. ज्या दिवशी विद्यार्थ्यांचा वाढदिवस असतो. त्या दिवशी त्या विद्यार्थ्यांकडून केक, चॉकलेटची अपेक्षा न करता केवळ शाळेतील ग्रंथालयाला एक पुस्तक भेट स्वरुपात देण्याची प्रथा येथील विद्यार्थ्यांना लावून दिली. या प्रथेतून शाळेतील गं्रथालयामध्ये विविध विषयांवरील पुस्तकांची भर पडत आहे. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होत आहे. विशेष म्हणजे, विविध विषयांवरीर ज्ञान तसेच इतर साहित्य आपण नेहमीच शाळेकडून घेत असतो. मात्र शाळेला काहीतरी दिले पाहिजे ही भावनाही विद्यार्थ्यांमध्ये रुढ होत आहे. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांमध्ये ग्रंथ वाचनाची चढाओढही येथे निर्माण झाली आहे. यातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत आहे. विशेष म्हणजे, ज्या दिवशी विद्यार्थ्याचा वाढदिवस असतो. त्या दिवशी प्रार्थनेच्या वेळी मुख्याध्यापक नरेंद्र बोबडे तथा अन्य शिक्षक विद्यार्थ्यांला गुलाबपुष्प देऊन आशीर्वाद देतात. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांंसह पालकांमध्येही आनंद व्यक्त केला जात आहे.

Web Title: Birthday of the students was a book!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.