दोन झाडांमधे जाळे टाकून पक्ष्यांची शिकार
By Admin | Updated: February 7, 2015 23:20 IST2015-02-07T23:20:45+5:302015-02-07T23:20:45+5:30
मांगरुड आणि तालुक्यातील इतर मालगुजारी तलावानजिक झाडावर जाळे टाकून पक्ष्यांची शिकार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अवैध शिकारीत

दोन झाडांमधे जाळे टाकून पक्ष्यांची शिकार
नागभीड: मांगरुड आणि तालुक्यातील इतर मालगुजारी तलावानजिक झाडावर जाळे टाकून पक्ष्यांची शिकार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अवैध शिकारीत रोज शेकडो पक्ष्यांना आपले प्राण गमवावे लागत आहे.
तलावाच्या एका बाजूला शेती आणि दुसऱ्या बाजूला जंगल अशा प्रकारचा तलाव देशी विदेशी पक्ष्यांसाठी अतिशय महत्वाचा असतो. ही बाब मांगरुड आणि तालुक्यातील इतर अनेक तलावांना लागू आहे. या ठिकाणी देशी विदेशी पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणावर मुक्तसंचार असतो. अशा तलावावर बदके, करकांचे, पाणकावळे, बगळे, ढोकरी, पोपट तसेच इतर पक्षी मोठ्या संख्येने वावरत असतात. दिवसभर तलाव आणि शेतात उदरभरणाची प्रक्रियावरुन सायंकाळी हे पक्षी झाडांवर मुक्कामाला येत असतात. नेमका याच संधीचा फायदा शिकारी घेत आहेत. दोन झाडांच्या मधोमध जाळे लावून पक्ष्यांची शिकार या शिक्षकाऱ्यांकडून होत आहे. संध्याकाळच्या अंधुक प्रकाशात पक्ष्यांना निट दिसत नसल्यामुळे पक्षी या जाळ्यात अलगद अडकत आहेत. येथील पक्षी अभ्यासक सतिश चारथळ आणि प्रशांत वालदे हे पक्षी नोंद घेण्याकरिता जंगलभ्रमण करीत असताना हा धक्कादायक प्रकार त्यांच्या नजरेस आला. उल्लेखनीय बाब अशी की त्यांनी हे जाळे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असता हे जाळे फार उंचावर असल्यामुळे त्यांना यात यश आले नाही. विशेष म्हणजे, गेल्याच महिन्यात वनविभागाकडून पक्ष्यांची आणि पाणपक्ष्यांची प्रगणना करण्यात आली आणि त्यानंतर लगेच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. (तालुका प्रतिनिधी)