कोट्यवधीची उधळपट्टी रस्ते मात्र ‘जैसे थे’
By Admin | Updated: December 30, 2014 23:32 IST2014-12-30T23:32:23+5:302014-12-30T23:32:23+5:30
औद्योगिक तालुका म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्यातील रस्त्यांच्या बांधकामासाठी व डागडुजी, खड्डे बुजविणे, झुडपे तोडणे आदी कामासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च झाला आहे.

कोट्यवधीची उधळपट्टी रस्ते मात्र ‘जैसे थे’
रत्नाकर चटप - नांदाफाटा
औद्योगिक तालुका म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्यातील रस्त्यांच्या बांधकामासाठी व डागडुजी, खड्डे बुजविणे, झुडपे तोडणे आदी कामासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च झाला आहे. दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्यांची कामे करताना दिसते. मात्र प्रत्यक्षात दोन-तीन वर्ष लोटूनही रस्त्यावरील खड्डे मात्र कायमच आहे. त्यामुळे सदर विभागाचे काम केवळ कागदावरच दिसून येत आहे.
तालुक्यातील भोयगाव- कवठाळा, भोयगाव- गाडेगाव, सांगोडा- हिरापूर- आवारपूर, अंतरगाव, नारंडा, नांदाफाटा, गडचांदूर, गडचांदूर- कोरपना, गडचांदूर- देवाडा, गडचांदूर- वनोजा, गडचांदूर - राजुरा आदी मुख्य मार्गावर संबंधित विभागाअंतर्गत काम करणारे कंत्राटदार कामे करीत आहे. मात्र कामात दर्जा नसल्याची ओरड नागरिकांची आहे. काही रस्त्यांवर केवळ मुरुम टाकून रस्त्यांची डागडूजी केली आहे. रस्त्यांचे बांधकाम झाल्यानंतर संबंधित विभागाकडे देखभालीची जबाबदारी असते. यासाठी शासन दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करतात. मात्र कामात पारदर्शकता नसल्याने प्रवाशांना खड्यातूनच प्रवास करावा लागत आहे. आजमितीला सिमेंट कंपन्यांकडे जाणाऱ्या गडचांदूर- नांदाफाटा, हिरापूर- वनोजा, कोरपना- गडचांदूर, भोयगाव- गडचांदूर मार्गाची अवस्था अधिक बिकट झाली आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून हेच खड्डे जिवघेणे ठरत आहे. आवारपूर- हिरापूर मार्गावरुन अनेक प्रवाशी जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधी व बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. हिच अवस्था तालुक्यातील अन्य मार्गाची झाली आहे. एकीकडे कोट्यवधी रुपयांचे कामे केल्याचा कांगावा करत करीत आहे. मात्र रस्त्याकडे बघितल्यास हाच काय विकास, अशा प्रतिक्रिया आता जनमानसातून येत आहे.
कोरपना - गडचांदूर मार्गावर सोनुर्ली गावाजवळ रस्त्याच्या कडा खचलेल्या आहे. यामुळे याआधी अनेक प्रवाशांचा अपघात होऊन मृत्यू झाला. आताही अधूनमधून दुचाकी वाहनांचे अपघात होत आहे. त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. अशा परिस्थितीत संबंधित विभाग कामे झाल्याचा कागदोपत्री पुरावा देत असले तरी रस्त्यांवरचे खड्डे मात्र बुजलेले नाही. एकाच मार्गावर वारंवार खड्डे बुजविण्याचे काम केले जात आहे. यात काही भागातील चार- दोन खड्डे बुजवून अर्ध्यावरच कामे रखडलेले आहे. त्यामुळे कामे झाली कुठे, असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करीत आहे.