अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक
By Admin | Updated: January 1, 2017 01:10 IST2017-01-01T01:10:27+5:302017-01-01T01:10:27+5:30
तळोधी (बा.) पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या सावरगाव- वलनी रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला.

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक
सावरगावजवळील घटना : एकाचा मृत्यू तर एक जखमी
तळोधी (बा.) : तळोधी (बा.) पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या सावरगाव- वलनी रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. जखमीला उपचाराकरिता नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शिवकुमार प्रल्हाद भुरे (३०) रा. कारधा जि. भंडारा असे मृताचे नाव आहे. मृत शिवकुमार भुरे व शुभम भेंडवले (१८) रा. कारधा जि. भंडारा हे शुक्रवारी रात्री गिरगाववरुन आपल्या दुचाकीने गावाकडे जात होते. या दरम्यान, वलनी- सावरगावच्या शेजारी अचानक एका भरधाव येत असलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
यात दोघेही गंभीर जखमी झाले. तळोधी (बा.) पोलीस स्टेशनला अपघाताची माहिती मिळताच जखमींना उपचाराकरिता चंद्रपूरला नेत असताना शिवकुमार प्रल्हाद भुरे याचा राजोली गावाजवळच मृत्यू झाला. जखमी शुभम भेंडवले यांच्या पायाला गंभीर जखम असल्यामुळे त्याला नागपूर मेडिकलला उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी सिंदेवाही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास तळोधी (बा.) पोलीस स्टेशनचे ठाणेदार विवेक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चांगदेव गिरडकर करीत आहेत. (वार्ताहर)