दुचाकी ट्रकवर धडकली; मुलगा ठार, आई जखमी
By Admin | Updated: May 8, 2015 01:16 IST2015-05-08T01:16:06+5:302015-05-08T01:16:06+5:30
दहाचाकी ट्रकला दुचाकी वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वाहनावरस्वार ३० वर्षीय मुलगा जागीच ठार तर आई गंभीररित्या जखमी झाली.

दुचाकी ट्रकवर धडकली; मुलगा ठार, आई जखमी
वरोरा : दहाचाकी ट्रकला दुचाकी वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वाहनावरस्वार ३० वर्षीय मुलगा जागीच ठार तर आई गंभीररित्या जखमी झाली. सदर अपघात नागपूर-चंद्रपूर मार्गावरील मजरा गाव शिवारात दुपारी ३.३० वाजता सुमारास घडला. अपघात एवढा भयंकर होता की, अपघातग्रस्त ट्रकला क्रेनच्या सहाय्याने उचलून दुचाकी वाहन व मृतदेह बाहेर काढावे लागले.
राजेंद्र नानाजी सालेकर (३०) असे मृताचे नाव आहे. तर आई कान्हुपात्रा नानाजी सालेकर (५०) या गंभीर जखमी आहेत. राजेंद्र हा एम.एच. ३२ यु. ९८८४ या क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने आईसोबत वरोरा येथून जामखुळा गावाकडे जात होते.
दरम्यान नागपूर- चंद्रपूर मार्गावर मजरा नजीकच्या बी.एस. कंपनीकडे जाणाऱ्या एम.एम. २९ टी २०४४ या क्रमांकाच्या दहाचाकी ट्रकने वळन घेतले. त्यावेळी दुचाकी ट्रकवर धडकली. त्यात दुचाकी वाहनावरील राजेंद्र सालेकर हे जागीच ठार झाले. तर त्याची आई कान्हुपात्रा सालेकर या गंभीररित्या जखमी झाल्या.
जखमीवर वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर चंद्रपूर येथे हलविण्यात आले. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे. मृत राजेंद्रचा दोन दिवसांवर विवाह होणार होता. त्यामुळे तो पत्रिका वाटप व इतर कामासाठी वरोरा येथे आला होता, हे विशेष. (तालुुका प्रतिनिधी)
विवाह मंडपात शोक
राजेंद्र सालेकरचा ९ मे रोजी यवतमाळ जिल्ह्यातील रुंझा गावातील एका युवतीसोबत जामखुळा येथे विवाह होणार होता. पत्रिका वाटप व इतर कामासाठी राजेंद्र वरोरा येथे आला होता. तर त्याच्या आप्तेष्टांनी घरी विवाह सोहळ्यासाठी मंडप उभारण्याचे काम सुरू केले होते. अपघातात राजेंद्र मरण पावल्याची वार्ता घरी पोहचताच मंडप अर्धवट सोडून वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात आप्तेष्टांनी धाव घेतली. त्यानंतर विवाह मंडपातील वातावरण शोकाकूल झाले.