अमानुषतेचा कळस! श्वानाच्या पायाला भला मोठा दगड बांधून नदीत फेकलं, संतापजनक व्हिडीओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2022 01:55 PM2022-07-18T13:55:50+5:302022-07-18T14:07:09+5:30

पहिला प्रयत्न फसला, दुसऱ्यांदा मात्र तो बाहेर आलाच नाही. बल्लारपूर तालुक्यातील धक्कादायक घटना, पशुप्रेमींनी व्यक्त केला संताप

big stone was tied to the dog's leg and throw him to the river flood; shocking incident in chandrapur district | अमानुषतेचा कळस! श्वानाच्या पायाला भला मोठा दगड बांधून नदीत फेकलं, संतापजनक व्हिडीओ व्हायरल

अमानुषतेचा कळस! श्वानाच्या पायाला भला मोठा दगड बांधून नदीत फेकलं, संतापजनक व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

चंद्रपूर : माणुसकीला लाजवेल असे कृत्य बल्लारपूर तालुक्यातील दहेली या गावामध्ये घडले आहे. एका निष्पाप पाळीव श्वानाच्या पायाला भला मोठा दगड बांधण्यात आला. त्यानंतर तोंड ताराने बांधून नदीमध्ये फेकून देण्यात आले. विशेष म्हणजे यासंदर्भातील व्हिडिओही वायरल करण्यात आला. समाजमन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमध्ये निष्पाप श्वानाचा मृत्यू झाला.

बल्लारपूर तालुक्यातील दहेली या गावामध्ये काही युवकांनी एका पाळीव श्वानाला अमानुषपणे ठार केले. तीन ते चार युवकांनी प्रथम श्वानाच्या पायाला दगड बांधला आणि मानेला फास आवळून त्याला नदीच्या पाण्यात मरण्यासाठी फेकून दिले. जिवाच्या आकांताने मोठ्या प्रयत्नाने तो नदीतून पोहून बाहेर आला. पाळीव असल्याने पुन्हा तो त्या युवकांजवळ आला. मात्र त्याला मारण्याचा पूर्णपणे विचार करून आलेल्या युवकांनी त्याचे पाय बांधून भलामोठा दगड बांधला. त्यानंतर तोंडाला ताराने बांधून पुन्हा नदीच्या पाण्यात फेकले. या वेळी मात्र तो पाण्यातून वर आलाच नाही. यासंदर्भातील व्हिडिओ सर्वत्र वायरल झाला. त्यानंतर येथील प्यार फाऊंडेशनच्या सदस्यांनी बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली आहे. अत्यंत निर्दयी कृत्य करणाऱ्यांवर कारवाईची मागणी आता केली जात आहे.

व्हिडीओ वायरल, सर्वत्र संताप

श्वानाच्या पायाला दगड बांधण्यात आले. त्यानंतर त्याच्या तोंडाला ताराने बांधून नदीच्या पाण्यात फेकण्यात आले. यासंदर्भातील व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्यात आला. यामुळे एकच संताप व्यक्त केला जात आहे. या अमानुष घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे.

बल्लारपूर पोलिसात तक्रार दाखल

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चंद्रपूर येथील प्यार फाऊंडेशनच्या सदस्यांनी यासंदर्भात बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांना दिले आहे. मात्र वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

पहिला प्रयत्न फसला

कुत्र्याला मारण्याच्या उद्देशाने त्याच्या पायाला प्रथम मोठा दगड बांधण्यात आला. त्यानंतर नदीत फेकण्यात आले. मात्र जिवाच्या आकांताने कुत्रा नदीच्या पाण्यातून पोहून बाहेर निघाला. मात्र त्याला पुन्हा पकडून तोंड, पाय बांधून नदीत फेकण्यात आले. यानंतर मात्र तो वर आलाच नाही.

Web Title: big stone was tied to the dog's leg and throw him to the river flood; shocking incident in chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.