बिबी ग्रामपंचायतीचा आदर्श घोटाळा उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:35 IST2021-01-08T05:35:49+5:302021-01-08T05:35:49+5:30

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश नांदाफाटा : गतवर्षी ग्रामपंचायत बिबी अनेक घोळांमुळे चर्चेत राहिली होती. ग्रामपंचायत बिबी येथील सरपंच मंगलदास ...

Bibi Gram Panchayat's ideal scam exposed | बिबी ग्रामपंचायतीचा आदर्श घोटाळा उघड

बिबी ग्रामपंचायतीचा आदर्श घोटाळा उघड

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश

नांदाफाटा : गतवर्षी ग्रामपंचायत बिबी अनेक घोळांमुळे चर्चेत राहिली होती. ग्रामपंचायत बिबी येथील सरपंच मंगलदास गेडाम यांनी लोकवर्गणीतून बिबी ते पाटोदा, शनी शिंगणापूर, शिर्डी, हिवरेबाजार येथे आदर्श गाव अभ्यास दौरा केला. या अभ्यास दौऱ्याकरिता लोकवर्गणी काढली असतानादेखील खोटे व बनावटी गाडी क्रमांकाची बिले जोडून ग्रामपंचायतीच्या स्मार्ट ग्राम निधीतून २ लाख ४२ हजार रुपयांची उचल करण्यात आली. यासंदर्भात नागरिकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे तक्रार केली असता चौकशीतून ‘आदर्श’ घोटाळा उघड झाला आहे. तसे सीईओंनी रक्कम वसुलीचे आदेश सरपंच व ग्रामसेवक यांना दिले असून, कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

स्मार्ट ग्राम निधीतून महिला सक्षमीकरण या निकषांवर बिबी ग्रामपंचायतीने १२१ महिलांचा आदर्श गाव अभ्यास दौरा राळेगणसिद्धी, पाटोदा, हिवरेबाजार येथे करण्यात आला. जिल्ह्याबाहेर शासकीय दौरा करताना सक्षम अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, ग्रामपंचायतीने अशी कुठलीही परवानगी घेतलेली नाही, असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या चौकशीतून स्पष्ट झाले. गावातील नागरिकांना अभ्यास दौरा लोकसहभागातून होत असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी प्रत्येक नागरिकांकडून एक हजार रुपये लोकवर्गणी काढण्यात आली. मात्र, या दौऱ्याचे बिल स्मार्ट ग्राम निधीतून काढून ग्रामपंचायतीने लाखो रुपयांचा आदर्श घोटाळा केल्याचे चौकशीतून उघड झाले आहे. याबाबत सरपंचाशी संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे दिली व बोलण्यास नकार दिला.

छत्री टूर्स अँड ट्रॅव्हल्सकडून याबाबची बोगस बिले घेतली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषी असल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बिबी येथील संतोष पावडे, चंदू चटप, संतोष उपरे, भारत आत्राम, स्वप्निल झुरमुरे, विजय हंसकर, राजेश खनके, सचिन सिडाम, हबीब शेख, सुनील भोयर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत पंचायत स्तरावर गटविकास अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले. या चौकशीअंती खोटी बिले व बनावटी गाडी क्रमांक टाकून २ लाख ४२ हजार रुपयांचा जो निधी उचलला त्याची वसुली सरपंच व ग्रामसेवक यांच्यामार्फत समप्रमाणात करण्यात यावी, तसेच सरपंच मंगलदास गेडाम यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियम कलम ३९ (१) अन्वये अपात्रतेची कारवाई का करण्यात येऊ नये म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Web Title: Bibi Gram Panchayat's ideal scam exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.