पोलीस ठाण्याच्या कॅमेऱ्यात बिबट कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 05:00 IST2020-09-06T05:00:00+5:302020-09-06T05:00:00+5:30
शुक्रवारी रात्री पोलीस ठाण्यात अधिकारी तथा कर्मचारी रोल कॉलसाठी उपस्थित होते. रोलकॉल संपतो न संपतो तोच या ठिकाणी उपस्थित असलेले हेमराज प्रधान बिबट, बिबट म्हणून ओरडले. नगर परिषद पाण्याच्या टाकीकडून प्रवेशद्वाराजवळ बिबट येताना त्यांना दिसला. त्यानंतर ठाणेदार सुनिलसिंग पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक व अन्य पोलीस अधिकारी तथा कर्मचारी बिबट्याला पाहण्यासाठी प्रवेशद्वाराच्या दिशेने धावले.

पोलीस ठाण्याच्या कॅमेऱ्यात बिबट कैद
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : भद्रावती परिसरात सध्या पट्टेदार वाघ, बिबट व हरीण यांचे दर्शन नित्यनेमाचे झाले आहे. बिबट्यांचा तर आतापर्यंत शहराच्या परिसरात संचार होता. पण आता तर मुक्तसंचार दिसून येत आहे. बिबट्याच्या संचारासाठी शहरातील काही भाग हॉटस्पॉट ठरत आहे. शुक्रवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास बिबट भद्रावती पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ चक्क येरझारा मारताना दिसून आला. पोलीस ठाण्यातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात या बिबटयाच्या हालचाली कैद झाल्या आहेत.
शुक्रवारी रात्री पोलीस ठाण्यात अधिकारी तथा कर्मचारी रोल कॉलसाठी उपस्थित होते. रोलकॉल संपतो न संपतो तोच या ठिकाणी उपस्थित असलेले हेमराज प्रधान बिबट, बिबट म्हणून ओरडले. नगर परिषद पाण्याच्या टाकीकडून प्रवेशद्वाराजवळ बिबट येताना त्यांना दिसला.
त्यानंतर ठाणेदार सुनिलसिंग पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक व अन्य पोलीस अधिकारी तथा कर्मचारी बिबट्याला पाहण्यासाठी प्रवेशद्वाराच्या दिशेने धावले. प्रवेशद्वाराजवळ उभे असताना व येरझारा मारताना सगळयांनीच बिबटला पाहिले.
काही क्षणातच बिबट्याने झुडुपातून तहसील कार्यालयाच्या दिशेने पलायन केल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.
बिबट्यांची पिंजऱ्याला हुलकावणी
छत्रपती नगर, बीएसएनएल कार्यालयाची भिंत, गौतमनगर, आयुधनिर्माणी परिसर सुमठाणा रोड, पूजा टॉवर, तहसील कार्यालय, पोलीस ठाणे परिसर, मल्हारीबाबा सोसायटी हा शहरातील परिसर बिबट्याच्या भ्रमणाच्या दृष्टीने हॉटस्पॉट ठरला आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी छत्रपती नगर परिसरात पिंजरासुद्धा लावण्यात आला. परंतु तीन ते चार दिवस बिबट्याने हुलकावणी दिल्याने आता पिंजरा गौतम नगर परिसरात लावण्यात आला आहे.
पट्टेदार वाघाची कारवरून उडी
वरोरा येथील श्रीनिवास कुंभार, गजानन भोयर व संकेत काळे हे तिघे आपल्या कारने जात असताना अचानक रस्ता दुभाजकावरून पट्टेदार वाघाने झेप घेतली. ही झेप सुमारे दहा ते १२ फूट उंच व चक्क कारवरून घेतल्याने कारमधील सर्वच भांबावून गेले. ही घटना मागील गुरूवारी कर्नाटका एम्टाच्या परिसरात असलेल्या नवीन पुलाजवळ रात्री ८.३० वाजता घडली.