‘त्या’ वृध्देच्या हातून हटले भिक्षापात्र

By Admin | Updated: May 14, 2015 01:45 IST2015-05-14T01:45:47+5:302015-05-14T01:45:47+5:30

पोटच्या गोळ्यानेच दगा दिल्याने ८५ वर्षीय वृद्धेवर भिक्षा मागण्याची वेळ आली.

The 'bhikshapatra' of the 'old age' | ‘त्या’ वृध्देच्या हातून हटले भिक्षापात्र

‘त्या’ वृध्देच्या हातून हटले भिक्षापात्र

रुपेश कोकावार ल्ल बाबुपेठ (चंद्रपूर)
पोटच्या गोळ्यानेच दगा दिल्याने ८५ वर्षीय वृद्धेवर भिक्षा मागण्याची वेळ आली. जीवनाच्या संध्याकाळी जगण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षाची व्यथा ‘मदर डे’ च्या दिवशी ‘लोकमत’ ने ‘मुलानेच दिले मातेच्या हाती भिक्षापात्र’ या वृत्तातून मांडली होती. याच वृत्ताची दखल एसआरएम कॉलेज आॅफ सोशल वर्कच्या विद्यार्थ्यांनी घेतली असून मंगळवारी या कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांनी पीडित वृद्ध महिलेच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्याची चुक लक्षात आणून दिली आहे. त्यामुळे त्या ८५ वर्षीय वृद्धेच्या संसारी पुन्हा सुखाचे दिवस येणार आहे.
नेहमी अशा गोष्टीविषयी सोशल मिडियाच्या माध्यमातून हळहळ व्यक्त करीत गप्प बसणाऱ्या युवा वर्गामध्ये सामाजिक दायित्व जोपासणारासुध्दा एक वर्ग असल्याचे या विद्यार्थानी आपल्या या सामाजिक कार्यातून दाखवून दिले आहे.
८५ वर्षीय वृद्धेचे भलेमोठे कुटुंब असूनसुध्दा तिच्यावर भिक्षा मागून जगण्याची वेळ आली. तिच्याच परिवाराकडून तिला भिक्षा मागायला लावण्याचा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू होता. एकीकडे ‘मदर डे’ चे औचित्य साधून आईची मनोभावे पूजा केली जात होती तर दुसरीकडे एक ८५ वर्षीय वृद्धा मुलाच्याच सांगण्यावरून भिक मागत होती. तिची ही व्यथा ‘लोकमत’ ने मदर डेच्या दिवशी समाजापुढे आणली. या वृत्ताची दखल एसआरएम कॉलेज आॅफ सोशल वर्क येथील विद्यार्थानी घेतली आहे. कॉलेच्या मुख्याध्यापिका तसेच सामाजिक कार्यकर्त्या जयश्री कापसे यांचे मार्गदशन घेऊन विशाल शर्मा आणि अंजली पिजारकर या विद्यार्थानी वृद्ध महिलेचा शोध घेतला. तसेच तिच्या परिवारातील सदस्यांना भेटून त्यांची चूक लक्षात आणून दिली आहे.
आपल्या हातून झालेली चुक त्यांनी मान्य करीत यानंतर असा प्रकार होणार नाही, अशी हमी या विद्यार्थाना वृद्धेच्या नातलगांनी दिली आहे. आपण एका वृद्धेला न्याय मिळवून दिल्याचे समाधान चेहऱ्यावर घेऊन ते विद्यार्थी तेथून निघून गेले. असे असले तरी अशा वृद्धासाठी जिल्हा प्रशासनाकडे कोणतीही उपाययोजना नसल्याचे समोर आले आहे. वृद्ध बेवारस आढळून आल्यास त्याच्या मदतीसाठी कोणताही टोल फ्री क्रमांक आजवर प्रसारित करण्यात आलेला नाही, हे विशेष.
मदर डेच्या दिवशी सोशल मिडीयावर आई कशी असते, हे दर्शविणारे पोस्ट फिरत होते. त्यातच काही युवकांनी ‘लोकमत’ च्या या वृत्ताची कात्रणदेखील पोस्ट केली. आणि ही बातमी फिरता-फिरता या विद्यार्थांच्या ग्रुपवर गेली. या वृत्ताची दखल घेत त्यांनी या वृद्ध महिलेला मदत करायचे ठरविले. आणि लगेच वृध्देच्या कुटुंबियांचे समुपदेशन केले.
पोटची मुले कितीही कृतघ्न निघाली तरी मातेचे मातृत्व आपल्या मुलांनविषयी कधीच कमी होत नाही. त्याचाच प्रत्यय त्या वृद्धेच्या घरी पोहचलेल्या विद्यार्थाना आला. मुलाने भिक्षा मागण्यास भाग पाडले असले तरी मुलगा अडचणीत येण्याच्या भीतीने मी स्वत: भिक्षा मागते, असे तिने सांगितले. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आईची ती धडपड होती.
वृद्ध महिलेच्या मदतीसाठी सदर विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात पोहचले. त्यांना तिेथून दूसऱ्या कार्यालयात पाठवण्यात आले. तिथे गेल्यावर तेथील कर्मचाऱ्यांकडून पुन्हा जिल्हा परिषद येथे पाठविण्यात आले. पुन्हा तिथे गेल्यावर त्यांना तिसऱ्याच कार्यालयात पाठवण्यात आले. शेवटी त्यांना त्या वृद्वेने स्वत: तशी तक्रार द्यावी आणि तिच्याकडे सर्व कागदपत्र असणे गरजेचे आहे, असे शासकीय उत्तर देण्यात आले. हा प्रकार समाजमन सुन्न करणारा आहे.

 

Web Title: The 'bhikshapatra' of the 'old age'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.