भट्टीजांबची शेती पाण्याअभावी करपली
By Admin | Updated: October 31, 2015 02:01 IST2015-10-31T02:01:09+5:302015-10-31T02:01:09+5:30
जांबभट्टी येथील संयुक्त वनव्यवस्थापन समिती ही वन, वन्यजीव व जैवविविधता संरक्षण, संर्वधन व व्यवस्थापन कामात दशकापासून सक्रियतेने कार्यरत आहे.

भट्टीजांबची शेती पाण्याअभावी करपली
शेतकरी अडचणी : आसोलामेंढा नहराचे पाणी पोहचतच नाही
मूल : जांबभट्टी येथील संयुक्त वनव्यवस्थापन समिती ही वन, वन्यजीव व जैवविविधता संरक्षण, संर्वधन व व्यवस्थापन कामात दशकापासून सक्रियतेने कार्यरत आहे. ग्रामस्थांच्या शेतीला दरवर्षी आसोलामेंढा नहराच्या तलावाद्वारे सिंचन व पाटबंधारे विभाग सावलीअंतर्गत पाणी पुरवठा होत असतो. परंतु सिंचन व पाटबंधारे विभागातील अभियंताच्या दुर्लक्षितपणामुळे दोन वर्षापासून आसोलामेंढा नहराचे पाणी शेतीला मिळत नसल्यामुळे भट्टीजांब व परिसरातील इतर गावाच्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिके करपली आहेत.
यंदा अल्प पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. असोलामेंढा तलावाचे पाणी दरवर्षी नियमीत मिळाल्यास शेतकऱ्यांना लाभ मिळू शकेल, तसेच दुसऱ्या नहराची व्यवस्था झाल्यास सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकणार आहे. याबाबत शासनाने तातडीने दखल घेवून वनसंरक्षण करणाऱ्या वनसेवकांच्या समस्यांचे निराकरण करावे यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले आहेत. पिक संरक्षणासाठी सिंचनाची सुविधा त्वरेने करावी, असे आवाहन भट्टीजांबवासियांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)