शंकरपूर तालुका निर्मितीसाठी दुसऱ्या दिवशी भजन आंदोलन
By Admin | Updated: September 21, 2016 00:44 IST2016-09-21T00:44:36+5:302016-09-21T00:44:36+5:30
शंकरपूर तालुका निर्मितीसाठी मंगळवारी दुसऱ्या दिवशीही व्यापारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली.

शंकरपूर तालुका निर्मितीसाठी दुसऱ्या दिवशी भजन आंदोलन
कडकडीत बंद : शाळा, महाविद्यालयांनीही घेतला सहभाग
शंकरपूर : शंकरपूर तालुका निर्मितीसाठी मंगळवारी दुसऱ्या दिवशीही व्यापारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. गावातील व परिसरातील भजन मंडळाने भजने गावून अभिनव आंदोलन केले.
तालुका निर्मितीसाठी शंकरपूर तालुका संघर्ष समिती व व्यापारी संघटनेच्या वतीने तीन दिवसीय बंद पुकारण्यात आला आहे. मंगळवारी दुसऱ्या दिवशी शाळा, महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय यांनी स्वयंमपूर्तीने शाळा बंद ठेवून तालुका निर्मितीसाठी पाठिंबा दिला. याच बरोबर परिसरातील जनतेनेही पाठिंबा दर्शवून समितीच्या मंडपाला भेट देत आहेत. गावातील गुरुदेव सेवा मंडळ, आदर्श महिला मंडळ, नूतन महिला मंडळ, महिला भजन मंडळ, वारकरी भजन मंडळ दहेगाव, हिरापूर येथील भजन मंडळ, वारकरी भजन मंडळ कवडशी यांनी भजने गावून आंदोलनात सहभाग दर्शविला. गावात शांततामय वातावरण असले तरीही लोकांच्या मनात तालुका निर्मितीसाठी जिद्द निर्माण झाली आहे.
येथील विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, राजीव गांधी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, राजीव गांधी महाविद्यालय, नेहरु विद्यालय, गॅलक्सी कॉन्व्हेंट, रुद्रमाला कॉन्व्हेंट, नेहरु, विकास, राजीव गांधी प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदी शाळांनी स्वयंपूर्तीने बंद पाळला. भजन आंदोलन उद्याही राहणार असून परिसरातील खेडे गावातही बंद पाळण्यात येणार आहे. मंगळवारी कवडशी (देश), चकजाटेपार आदी गावातील छोट्या दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. (वार्ताहर)