भद्रावतीच्या ‘रितेश’ने घेतली चित्रपटसृष्टीत भरारी

By Admin | Updated: March 9, 2015 01:31 IST2015-03-09T01:31:12+5:302015-03-09T01:31:12+5:30

जिल्ह्यात कोळशासोबत कलावंतांचीही खाण आहे, असे म्हणतात. याचा प्रत्यत पुन्हा एकदा आला आहे.

Bhadravati's 'Ritesh' starred in the film industry | भद्रावतीच्या ‘रितेश’ने घेतली चित्रपटसृष्टीत भरारी

भद्रावतीच्या ‘रितेश’ने घेतली चित्रपटसृष्टीत भरारी

चित्रीकरण विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर आधारित चित्रपट
सचिन सरपटवार ल्ल भद्रावती
चंद्रपूर
जिल्ह्यात कोळशासोबत कलावंतांचीही खाण आहे, असे म्हणतात. याचा प्रत्यत पुन्हा एकदा आला आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर आधारित ‘आत्मदाह’ या चित्रपटात नायक असलेल्या ‘कृष्णा’ची भूमिका भद्रावतीच्या रितेश भाऊराव नगराळे रा. पाटीलनगर या युवकाने साकारली आहे. ग्रामीण भागातल्या युवकाने चित्रपटसृष्टीत घेतलेली ही भरारी इतर कलावंतांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
या चित्रपटाचे कथानकही बोध घेण्यासारखे आहे. मुलाने खुप शिकून मोठा अधिकारी व्हावे, ही शेतकरी असलेल्या वडिलांची इच्छा असते. त्यासाठी मुलाला ते पुण्याला पाठवितात. स्पर्धा परीक्षेची तारीख जवळ आली असते. अचानक वडिलांच्या आत्महत्येची बातमी मुलाला कळते. मुलगा खेडेगावात परत येतो. त्यानंतर मात्र पुण्याला न जाण्याचा निर्णय घेतो. आई व बहिणीचा सांभाळ हेच तो आपले कर्तव्य समजतो. शांत न बसता वडिलांच्या आत्महत्येच्या कारणांचा तो शोध घेतो. यामागे कारणीभूत असलेला सावकार त्याला सापडतो. सावकाराने हडपलेली जमीनही त्याला परत मिळते. सावकाराच्याच मुलीवर त्याचे प्रेमही जडते. हे जरी चित्रपटाचे कथानक असले तरी या चित्रपटातील ‘कोमाच्या सिन’ व वडिलांना आत्महत्येचा झालेला पश्चात्ताप हे दृश्य मनाला चटका लावून जात असल्याचे स्वत: या शेतकऱ्याचा मुलगा असलेला कृष्णा म्हणजेच रितेशने सांगितले.
रितेशचे शिक्षण दहावीपर्यंत येथील सेक्युलर विद्यालयात झाले. नंतर औरंगाबाद व पुणे येथे त्याने शिक्षण घेतले. पुणे येथे मास्टर आॅफ परफॉर्मिंग आर्टसचा त्याने अभ्यास केला. एकांकिका तसेच व्यावसायिक नाटकही केले. कोरिओग्राफर अर्जुन जाधव यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. याच काळात त्याला ‘आत्मदाह’ या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. अन् ग्रामीण भागातल्या रितेशने या संधीचे सोने केले. यवतमाळ जिल्ह्यातील बोरगाव (आर्णीजवळ), दाभळी, लोणबेल या ठिकाणी या चित्रपटाचे जास्तीत जास्त चित्रीकरण झाल्याचे रितेशने सांगितले. शेतकऱ्याच्या कुटुंबात शेतकरी यशवंत जामकर, बायको रत्ना कोल्हापूरकर, शेतकऱ्याचा मुलगा कृष्णा (रितेश), सुप्रिया पाटील यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश बाठोरे तर निर्माते सुनील जयस्वाल हे आहेत. सावकाराने केलेल्या फसवणुकीमुळे शेतकरी वडील आत्महत्या करतात. शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या दृश्यापासूनच चित्रपटाची सुरुवात होते. नवऱ्याच्या आत्महत्येमुळे कृष्णाची आई कोमात जाते व तब्येत बरी झाल्यानंतर ती वडिलांनी आत्महत्या का केली, या प्रकरणाची कृष्णाला माहिती देते.
या चित्रपटात ‘क्रोमाचा सिन’ एक वेगळेपणा दर्शवतो. जेव्हा शेतकऱ्याला जाळले जात असते तेव्हा तो शेतकरी जिवंत असल्याचा भास निर्माण करण्यात येतो. त्या ठिकाणी शेतकरी असतो, परंतु तो कोणालाही दिसत नाही. तो इंद्रदेवाचे आभार मानतो. शेवटी आपण आत्महत्या केली, याबाबत शेतकऱ्याला पश्चात्ताप झाल्याचे दाखविले आहे.
शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, हा संदेश या चित्रपटातून देण्यात आल्याचे रितेशने सांगितले. तसेच शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे असल्याचे तो लोकमतशी बोलताना म्हणाला.

Web Title: Bhadravati's 'Ritesh' starred in the film industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.