भद्रावती-वरोरा मतदारसंघ समस्यांच्या विळख्यात

By Admin | Updated: February 15, 2016 01:06 IST2016-02-15T01:06:51+5:302016-02-15T01:06:51+5:30

भद्रावती व वरोरा हे दोन तालुके मिळून बनलेला वरोरा विधानसभा मतदार संघ राज्याच्या स्थापनेच्या ५५ वर्षानंतरही उपेक्षीत आहे.

Bhadravati-Varora Constituency | भद्रावती-वरोरा मतदारसंघ समस्यांच्या विळख्यात

भद्रावती-वरोरा मतदारसंघ समस्यांच्या विळख्यात

नागरिकांना विकासाची प्रतीक्षा : लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे
माजरी : भद्रावती व वरोरा हे दोन तालुके मिळून बनलेला वरोरा विधानसभा मतदार संघ राज्याच्या स्थापनेच्या ५५ वर्षानंतरही उपेक्षीत आहे. बहुतांशवेळा या मतदारसंघातून जे प्रतिनिधी निवडून गेले त्यांच्याच किंवा मित्र पक्षाची राज्यात सत्ता आली. तरीही या मतदार संघाचा अपेक्षीत विकास साधला गेला नाही. मतदार संघातील शेवटच्या टोकापर्यंत नजर टाकली तर हा मतदार संघ समस्यांच्या विळख्यात दिसून येते.
आता शासन दरबारी वरोरा विधानसभाक्षेत्र अशी ओळख आहे. यापूर्वी या मतदार संघाचे नाव भद्रावती होते. या मतदार संघाचे केवळ नाव (शहराचे) बदलवून शासनाने काय साध्य केले, हे अद्यापही कळू शकलेले नाही. नाव बदलविण्यापेक्षा विकास गंगा वाहू लागली असती तर जनतेला लाभाचे ठरले असते. या मतदार संघातील कित्येक गावात सरकारी एसटी पोहचली नाही. नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी ग्रामस्थांना मिळत नाही. शेत सिंचनाची आवश्यकतेप्रमाणे सोय नाही. भद्रावती व वरोरा दोन्ही तालुके प्रदूषणाने ग्रासले आहेत.
भद्रावती आणि वरोरा तालुक्यात नदी- नाले असून सुद्धा जनता व शेती मात्र ताहनलेलीच आहे. या विधानसभा क्षेत्रातील प्रदूषण अवाक्याबाहेर गेले आहे. मात्र यावर योजना व उपाय केवळ कागदोपत्रीच दखविले जातात. ग्रामीण क्षेत्रात स्थानिक पातळीवर मुलभूत सुविधा नसल्यने ग्रामीण क्षेत्रात काम करणारे अधिकारी- कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे मतदारसंघातील नागरिक शासनाकडे आश्वासक विकासाच्या नजरेने पाहत आहे.
वरोरा-भद्रावती मतदार संघाअंतर्गत ग्रामीण कित्येक रस्त्यालगत साधे प्रवाशी निवारे नाही. कित्येक ठिकाणची प्रवाशी निवारे जीर्णावस्थेत आहेत. काही निवाऱ्यात किंवा समोरील जागेवर अतिक्रमण झाले आहे. ग्रामीण भागातील विजेच्या खेळ खंडोबाने ग्रामस्थ त्रस्त आहेत. अनेक गावात पाण्याचा प्रश्न आजही भेडसावत आहे.
१४ आॅक्टोबर २०१४ ला विधानसभाची सार्वत्रीक निवडणूक झाली. प्रतिनिधी व सरकार बदलले. त्यामुळे जनतेच्या विकासाच्या अपेक्षा वाढल्या. केंद्रात व राज्यात सरकार चालविणारे आमदार- खासदार सत्ताधारीपक्षाचेच आहेत. यामुळे विकास कामासाठी व योजना राबविण्यासाठी निधीची वानवा राहणार नाही, अशी मतदारांची अपेक्षा आहे.
सध्या स्थितीचा आढावा घेतला असता विकास कामांअभावी मतदार संघ भकास झाला आहे, असे म्हणण्याची पाळी आली आहे. प्रदूषणाचे भूत जनतेच्या मानगुटीवर बसले आहे. यामुळे मानसाला स्वच्छ प्राण वायुचा श्वास घेणेही दुर्लभ झाले आहे. ध्वनी प्रदूषणाने कानठल्या बसत आहे. या दोन्ही तालुक्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्येत दिवसागणीक वाढ होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Bhadravati-Varora Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.