अलोट गर्दी : पावसाळी वातावरणावर उत्साहाची मातचंद्रपूर: रविवारी रात्रीपासून बरसणारा पाऊस सोमवारी सकाळीही कायम होता. अशा रिमझिम पावसातच गणरायाला निरोप देणे सुरू झाले. दुपारी १२ वाजेपर्यंत रिमझिम पाऊस सुरूच होता. विसर्जन मिरवणुकीचे काय होईल, अशी भीती प्रत्येक मंडळाला होती. अशातच पावसाची रिपरिप कमी झाली आणि ढोलताशाचा गजर आणि डीजेचा ताल, संदल, बँडचे ठोके वाजू लागले. या धुंद वातावरणात गणेशभक्तांची पावलं थिरकू लागली. यंदा तप्त सुर्यकिरण नसल्याने वातावरणात गारवा होता. या गारव्यातच गणरायाला चंद्रपूरकरांनी निरोप दिला. यावेळी शहरातील प्रमुख मार्गावर गणेशभक्तांची अलोट गर्दी उसळलेली होती. विविध गणेशमंडळांनी केलेली आकर्षक सजावट व देखावे मिरवणुकीत लक्ष वेधून घेत होते.गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आज शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एरवी विसर्जनाच्या दिवशी सकाळी १० वाजतापासूनच शहरातील अंतर्गत वार्डातील सार्वजनिक गणेश मंडळ मिरवणुकीला प्रारंभ करतात. मात्र मागील चार दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आज सकाळपासून कायमच होता. पाऊस उसंत घेईल, या प्रतीक्षेत अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी काही वेळ प्रतीक्षा करणे पसंत केले. मात्र रिमझिम पाऊस दुपारी १२ वाजेपर्यंत कायमच होता. अखेर काही मंडळांनी प्लॅस्टिक, ताडपत्री झाकून मिरवणूक काढली. दुपारी १२ वाजतानंतर काही विसर्जन मिरवणुका कस्तुरबा मार्गावर आल्याचे दिसून आले. त्यानंतर दुपारी १.३० वाजताच्या सुमारास पावसाची रिपरिप बंद झाली आणि ढोलताशे, डिजेची धूम सुरू झाली. दुपारी २.३० वाजेपर्यंत रामनगर, नगिना बाग मार्ग, भानापेठ, पठाणपुरा मार्ग, अंचलेश्वर गेटच्या आतील मार्गावर विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. त्यामुळे दुपारी १ ते २ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सायंकाळी ४ वाजेपर्यंत शहरातील मुख्य मार्ग जटपुरा गेट, कस्तुरबा मार्ग, महात्मा गांधी मार्ग या मार्गांवर सार्वजनिक गणेश मंडळांची रिघ लागली होती. विठ्ठल मंदिर वॉर्ड, पठाणपुरा, समाधी वॉर्ड परिसरातील गणेश मंडळे गांधी चौकात पोहोचली. यावेळी लोकमान्य टिळक शाळा ते जटपुरा गेट या मार्गावर असलेल्या गणेश मंडळांचे मंदगतीने मार्गक्रमण सुरू होते. यावेळी चौकाचौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्याऐवजी पोलिसांनी दर काही मीटर अंतरावर पोलीस तैनात ठेवले होते. त्यांच्यासोबत एक वाहतूक पोलीसही असल्यामुळे कुठेही वाहतूक ठप्प होताना दिसली नाही. चक्क़ दुपारी २.३० वाजताच्या सुमारास मिरवणुका सुरू असूनही कस्तुरबा मार्गावरून चारचाकी वाहने जाताना दिसली. यात खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षकांचेही वाहन होते.जटपुरा गेटवर जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्व गणेश मंडळांवर पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले. गांधी चौकात जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने गणेश मंडळाचे स्वागत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया, राहुल पुगलिया, गजानन गावंडे तर लोकमान्य टिळक शाळेजवळ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार, आ. नाना शामकुळे, किशोर जोरगेवार व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेश मंडळांचे स्वागत केले. दाताळा मार्गावरील इरई नदी व रामाळा तलावात गणेश विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पहिल्या सार्वजनिक गणेश मंडळाचे विसर्जन झाले. यावेळी महात्मा गांधी मार्ग व कस्तुरबा मार्गावर मिरवणुका सुरूच होत्या. (शहर प्रतिनिधी)
‘बाप्पा मोरया’च्या गजरात श्रींना निरोप
By admin | Updated: September 9, 2014 00:15 IST