चंद्रपूर : 'ब्लिस्टरिंग डिसीज' हा त्वचेवर पाणी भरलेले फोड येणारा एक दुर्मीळ स्वयंप्रतिकार विकार आहे. यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती चुकून आपल्याच निरोगी पेशींवर हल्ला करते. त्यामुळे त्वचा आतून भाजल्यासारखी झाल्याने रुग्णांना असह्य वेदना होतात. त्यामुळे त्वचेवर असे फोडे दिसल्यास लगेच वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन त्वचारोग तज्ज्ञ डॉ. स्नेहल पोटदुखे यांनी केले आहे.
ब्लिस्टरिंग डिसीज म्हणजे काय ?ब्लिस्टरिंग डिसीज म्हणजे त्वचेवर किंवा तोंड, नाक यासारख्या श्लेष्मल त्वचेवर मोठे पाणी किंवा पस भरलेले फोडे येणे. हा एक स्वयंप्रतिकार विकार आहे. यात शरीराची रोगप्रतिकार शक्ती चुकून आपल्याच निरोगी पेशींना परके समजून त्यांच्यावर हल्ला करते. ज्यामुळे त्वचेतील पेशींमधील जोडणी कमकुवत होऊन फोड तयार होतात.
अनेकदा डॉक्टरांनाही निदान करण्यास उशीर
- 'ब्लिस्टरिंग डिसीज'चे या विकाराची लक्षणे इतर त्वचारोगांसारखीच दिसतात.
- सुरुवातीस अॅलर्जी, बर्न्स किंवा इन्फेक्शन समजून चुकीचे निदान होऊ शकते. बायोप्सी, अँटीबॉडी चाचण्याद्वारे निश्चित निदान लांबले, तर त्वचेचा मोठा भाग खराब होण्याचा धोका संभवतो.
काय काळजी घ्याल?फोडावर कोणतेही घरगुती उपचार करू नका. स्वच्छता पाळा : फोड फुटल्यास संसर्ग होण्याचा धोका. प्रतिकारशक्ती नियंत्रित ठेवणाऱ्या इम्युनो-सप्रेसिव्ह औषधांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावा. आहार व जीवनशैली संतुलित ठेवावी. तसेच त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
कारणे आणि लक्षणे कोणती?
- मोठे, पाणी भरलेले फोड : त्वचेवर मोठे, नाजूक फोड येतात जे फुटल्यावर जखमा होतात.
- वेदना आणि खाज : फोड आलेल्या ठिकाणी तीव्र वेदना होतात आणि खूप खाज सुटते.
- तोंडात फोड : काही रुग्णांना तोंडात किंवा घशातही फोड येऊ शकतात. ज्यामुळे खाणे-पिणे कठीण होते.
- संक्रमण : फोड फुटल्याने खुल्या जखमा होतात. जिवाणू संसर्ग होऊ शकतो.
"ब्लिस्टरिंग डिसीज ही एक दुर्मीळ पण गंभीर स्वयंप्रतिकार विकृती आहे. याची लक्षणे सुरुवातीला सामान्य त्वचारोगांसारखी दिसतात, त्यामुळे निदानात उशीर होऊ शकतो. रुग्णांनी कोणतीही घरगुती चिकित्सा न करता त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, योग्य वेळी उपचार न झाल्यास त्वचेचे आणि शरीराचे मोठे नुकसान होऊ शकते."- डॉ. स्नेहल पोटदुखे, त्वचारोग तज्ज्ञ, चंद्रपूर