लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीसाठी ऑनलाइन बुकिंग करताना बनावट संकेतस्थळांचा वापर करून पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
चंद्रपूर वनविभागाच्या प्रकल्प कार्यालयाला २३ ऑक्टोबर २०२५ ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत एकूण १६ पर्यटकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. संबंधित पर्यटकांनी गुगलवर शोध घेऊन बनावट संकेतस्थळांवरून ताडोबा सफारीसाठी ऑनलाइन तिकीट आरक्षित केले होते.
ई-तिकिटे मिळाल्यानंतर ते झरी-पेट गेट, मामला बफर गेट, सोमनाथ पर्यटन गेट, कोलारा गेट, केसलाघाट गेट, आगरझरी गेट, मोहर्ली गेट, शेडेगाव सफारी गेट तसेच कारवा गेट येथे पोहोचले. मात्र प्रवेशद्वारावर तपासणी केल्यानंतर त्यांच्या तिकिटे बनावट असल्याचे समोर आले आणि त्यांना सफारीसाठी प्रवेश नाकारण्यात आला. वनविभागाच्या चौकशीत संबंधित संकेतस्थळे अधिकृत नसून पर्यटकांची फसवणूक करण्यासाठी तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर २८ फेब्रुवारी २०२६ रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार वनपाल निशा नामदेवराव राठोड (रा. अरिहंतनगर, तुकूम, चंद्रपूर) यांनी रामनगर पोलिसात अधिकृत तक्रार दाखल केली.
याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता कलम ३१८ (४), ३३६ (३) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ड) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलिस ठाण्याचे ठाणेदार आसीफराजा शेख करत आहेत.
या पर्यटकांची झाली ऑनलाइन फसवणूक
पोलिस तपासात तन्वी तावडे, विशाल एच., निकेतन कुलकर्णी, नंदकुमार साळवे, नीलेश चव्हाण, गणेश नाईक, अर्शद बिन, परथ, सुभाष शेडमाके, विलास कौरई, मुकुंद पाठक, अलीझा आनंद, गजदेव दाभे, श्रुती चंद्रा मोरे, मोनिका मात्रे आदी पर्यटकांची एकूण २ लाख १५ हजार ९४२ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
Web Summary : Tourists booking Tadoba safari online were cheated of ₹2.15 lakhs via fake websites. Police investigation underway after multiple complaints of fraudulent tickets.
Web Summary : ताडोबा सफारी की ऑनलाइन बुकिंग में नकली वेबसाइटों के ज़रिए पर्यटकों को 2.15 लाख रुपये का चूना लगा। धोखाधड़ी के कई मामलों के बाद पुलिस जांच जारी है।