लाभार्थ्यांचे साहित्य गोडाऊनमध्ये !
By Admin | Updated: November 4, 2016 01:15 IST2016-11-04T01:15:41+5:302016-11-04T01:15:41+5:30
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी अनेक योजना राबविल्या जातात. या योजना चंद्रपूरच्या जिल्हा परिषदेनेही राबविल्या.

लाभार्थ्यांचे साहित्य गोडाऊनमध्ये !
पुरवठाच केला नाही : साहित्यांची दुर्दशा; प्रोटीन्स उंदरांनी खाल्ले
चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी अनेक योजना राबविल्या जातात. या योजना चंद्रपूरच्या जिल्हा परिषदेनेही राबविल्या. मात्र अनेक योजनेतील लाभ प्रत्यक्षात लाभार्थ्यांना मिळालाच नाही. अशाच एका योजनेतील बैलबंडीचे प्रकरण या मिनी मंत्रालयात चांगलेच गाजले. आता पुन्हा नवा प्रकार समोर आला आहे. गरोदर माता, स्तनदा माता, कुमारिका, बालके यांच्यासाठी महिला व बाल कल्याण विभागामार्फत लाखो रुपयांचे साहित्य साहित्य, औषधी शासनस्तरावरून पुरविण्यात आले. मात्र जिल्हा परिषदेने त्याचा लाभार्र्थ्यांना पुरवठाच केला नाही. हे साहित्य पंचायत समितीच्या गोडावूनमध्ये धूळखात पडले आहे.
स्तनता माता, गरोदर माता, बालके यांचे आरोग्य सुदृढ रहावे, जिल्हा कुपोषणमुक्त व्हावा, याशिवाय कुमारिका शिक्षणाच्या प्रवाहात याव्या, यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत प्रोटीन पावडर, सायकल, शिलाई मशीन आदी साहित्यांचे लाभार्थ्यांना वाटप केले जाते. हे लाखो रुपयांचे साहित्य शासनाकडून जिल्हा परिषदेकडे अनेक महिन्यांपूर्वीच आले. या साहित्यांचा लाभार्थ्यांपर्यंत ुपुरवठा व्हायला हवा होता. तेव्हाच शासनाच्या योजनेची फलश्रुती झाली असती. मात्र तसे झाले नाही. सत्ताधारी पदाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हे साहित्य पंचायत समिती स्तरावर धूळखात पडले आहे.
जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते व विद्यमान सदस्य सतीश वारजूकर यांनी सिंदेवाही पंचायत समितीच्या गोडावूनची पाहणी केली असता गोडावूनमध्ये अनेक साहित्य धूळ खात पडलेले असल्याचे निदर्शनास आले. त्यामध्ये सायकल, शिलाई मशिन, सौर दिवे, प्रोटीन पावडर आदी साहित्यांचा समावेश होता. प्रोटीन पॉवडर तर अक्षरश: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडलेले आहेत. एकीकडे २०१६-१७ या आर्थिक सत्रासाठी साहित्य खरेदीकरिता जिल्हा परिषदेची लगबग सुरु आहे. दुसरीकडे मिळालेले साहित्यच अद्याप लाभार्थ्यांपर्यंत पोहचले नाही. जर साहित्य गोरगरिबांपर्यंत पोहोचत नसतील तर पदाधिकारी म्हणून मिरविण्यात काय अर्थ आहे, असे वारजूकर यांनी म्हटले आहे.
मागील सत्रातील साहित्य धूळ खात पडलेले असतानाही ते सत्ताधाऱ्यांना दिसू नये, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. कुपोषित बालकांना कृपोषणापासून वाचविण्यासाठी पुरवठा करण्यात आलेले प्रोटीन पावडर उंदराने खाऊन टाकले आहे. लाखो रुपयांचे प्रोटीन पावडरचे बॉक्स पाण्याने खराब झालेले आहे. जमिनीवर गोडावूनभर उंदराने खालेले पॉकेट पडलेले आहे. असे असतानाही पदाधिकारी मात्र सुस्त आहेत. (शहर प्रतिनिधी)
सभापतींनी राजीनामा द्यावा
सिंदेवाही तालुक्यातील पंचायत समिती गोडाऊनला भेट दिली असता तिथे शिलाई मशिन, सोलर लाईट, सायकल, प्रोटीन पावडर इत्यादी वस्तू धूळ खात पडलेले दिसून आले. गरीब जनतेच्या योजना गरिबांपर्यंत पोहचविण्यात सत्ताधारी पदाधिकारी असक्षम झालेले आहेत. मात्र यातून गरीब लाभार्थ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे महिला व बाल कल्याण सभापतींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी गटनेते सतीश वारजूकर यांनी केली आहे.