लाभार्थी वंचित : पुन्हा सर्वेक्षण करण्याची मागणीपिंपळगाव : ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील कुटूंबाचे जीवनमान उंचवावे तसेच त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी घरकूल योजना राबविण्यात येत आहे. पिंपळगाव (मो) येथेसुद्धा या योजनेसाठी गेल्या १० ते १२ वर्षापासून बीपीएल खालील कुटुंबाची पायपीट सुरू आहे. मात्र शासकीय अधिकाऱ्यांनी सर्वे करून केवळ दोनच घरकुलांना मंजुरी दिली. पिंपळगाव (मो) येथे ७०० च्या वर दारिद्र्यरेषेखालील कुटुंब संख्या असताना फक्त दोनच घरकूल मंजूर करण्यात आल्याने इतरांवर अन्याय झालेला आहे. त्यामुळे शासनाने पुन्हा सर्वेक्षण करून इतरांनाही न्याय द्यावा, अशी मागणी उपसरपंच हेमराज कामडी यांनी केली आहे.ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव (मो) येथे मागील १० वर्षात अनुसूचित जाती, जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांची निवड करून त्यांना घरकूल मंजूर करण्यात आले होते. येथे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाची संख्या ७१६ असून ८ ते २१ गुणांच्या आत आहे. कित्येक कुुटुंबाला स्वयंपाक करण्यासाठी खोलीसुद्धा नाही. त्यामुळे त्यांचा परिवार आभाळाच्या छताखाली आला आहे.येथील ग्रामपंचायतीने जून २०१५ मध्ये बीपीएल खालील सर्व कुटुंबांना घरकूल मिळणार म्हणून मागणी बिल देण्याअगोदरच गृहकर, पाणीकर बीपीएल लाभार्थीकडून वसूल केले. त्यांच्या घराचे फोटोसुद्धा मागितले. आपणाला हक्काचा निवारा मिळणार, या आशेने गरीब लाभार्थ्यांनी उधार उसने करून खर्चाचा मेळ जमवून ग्रा.पं. कार्यालयात सर्व कागदपत्रे जमा केली. परंतु ७०० च्यावर दारिद्र्यरेषेखालील कुटुंब असताना केवळ दोनच कुटुंबांना घरकूल मिळणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे पिंपळगाववासीयामध्ये रोष व्यक्त केला जात आहे.घरकूल योजनेत गावातील लाभार्थी संख्या लक्षात घेऊन एका वर्षाला किमान ५० ते ७५ लाभार्थ्यांना सामावून घ्यावे, अशी मागणी पिंपळगाव येथील उपसरपंच हेमराज कामडी यांनी केली आहे. (वार्ताहर)
लाभार्थी ७०० च्यावर; मंजुरी दोनच घरकुलांना !
By admin | Updated: November 15, 2015 00:40 IST