वर्षभरापासून निराधार व तत्सम योजनेचे लाभार्थी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:19 IST2021-07-21T04:19:58+5:302021-07-21T04:19:58+5:30
जिवती : जिल्ह्यातील जिवती या नक्षलग्रस्त, दुर्गम व आदिवासीबहुल तालुक्यातील पाटण येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अनागोंदी कारभारामुळे ...

वर्षभरापासून निराधार व तत्सम योजनेचे लाभार्थी वंचित
जिवती : जिल्ह्यातील जिवती या नक्षलग्रस्त, दुर्गम व आदिवासीबहुल तालुक्यातील पाटण येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अनागोंदी कारभारामुळे येथील संजय गांधी निराधार योजना व तत्सम योजनेच्या शेकडो लाभार्थ्यांना वंचित ठेवण्यात आले आहे. ही गंभीर बाब राजुराचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या लक्षात आणून देताच त्यांनी माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिली. आ.मुनगंटीवार यांनी त्वरित जिल्हाधिकारी यांच्यासोबत यासंदर्भात बैठक घेऊन चर्चा केली.
या निराधार योजनेच्या समस्या पुराव्यानिशी माजी आमदार निमकर यांनी मांडली. जिल्हाधिकाऱ्यांनी बँकेच्या उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरत या सर्व लाभार्थ्यांना त्वरित लाभ वितरित करण्याची सूचना केल्यामुळे या सर्व लाभार्थ्यांना लवकरच लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पाटण येथील स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत परिसरातील नागरिकांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, वृद्ध भूमिहीन शेतमजूर पेन्शन, दिव्यांग व विधवा पेन्शन अदा केली जात होती; परंतु मागील वर्षभरापासून या सर्व योजनांच्या शेकडो लाभार्थ्यांना मात्र येथील शाखा अधिकाऱ्यांच्या अजब नियमामुळे वंचित रहावे लागले आहे. या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांच्या नावे किंवा त्यांच्या वारसदारांच्या नावे बँकेमार्फत घेतलेले इतर कर्ज थकीत असेल त्या लाभार्थ्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले आहे. हा या लाभार्थ्यांवर अन्याय असून, शासन निर्णयाची अवहेलना केली जात होती.
200721\img-20210720-wa0175.jpg
जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करताना माजी आमदार सुदर्शन निमकर