लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन वाटपात दिरंगाई
By Admin | Updated: April 3, 2016 03:50 IST2016-04-03T03:50:10+5:302016-04-03T03:50:10+5:30
वनविभाग व वन व्यवस्थापन समितीमार्फत गॅस कनेक्शन मिळण्याकरिता लाभार्थ्यांनी रकमेचा भरणा केलेला आहे.

लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन वाटपात दिरंगाई
वनाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : अनुसूचित जाती लाभार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष
घोसरी : वनविभाग व वन व्यवस्थापन समितीमार्फत गॅस कनेक्शन मिळण्याकरिता लाभार्थ्यांनी रकमेचा भरणा केलेला आहे. ८-९ महिन्याचा विलंबानंतरही लाभांकित केले नसल्याने स्थानिक अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांमध्ये असंतोष व्यक्त केला जात आहे.
पोंभूर्णा तालुक्यातील घोसरी वनक्षेत्रातील अनुसूचित जाती प्रवर्गातील २५ लाभार्थ्यांनी २ हजार ५५० रु. वन व्यवस्थापन समिती सचिव तथा वनपाल माणिक गोंगले यांच्याकडे भरले. त्यामुळे शासकीय अनुदान वरिष्ठ स्तरावरुन प्राप्तदेखील झालेले असल्याचे कळते. तरीदेखील लाभार्थ्यांना गॅस वाटप करण्यास दिरंगार्ई केली जात असल्याने सरपणाचा प्रश्न आवासून उभा ठाकला आहे.
इतर प्रवर्गातील लाभार्थ्यांना दिवाळीमध्येच गॅस कनेक्शन दिलेला आहे. तद्नंतर वनपाल गोंगले यांची कोठारी येथे बदली होवून रुजू झाल्यानंतर दोन महिन्यापासून आर्थिक प्रभार संबंधितांकडे दिलेला नसल्याने गॅस वितरणाचे वाटप अडगळीत पडलेले आहे. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांची होत असलेली गळचेपी बघून यथाशिघ्र कार्यवाही करावी. अन्यथा वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा नवनियुक्त वन व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. (वार्ताहर)