पोटच्या गोळ्यांनी नाकारलेल्यांच्या हाती आले भिक्षापात्र
By Admin | Updated: February 2, 2015 23:02 IST2015-02-02T23:02:33+5:302015-02-02T23:02:33+5:30
ज्यांना बोट धरून चालायला शिकविलं, मोठ्या प्रेमाने ज्यांचं संगोपन करून मोठही केलं. त्याच पोटच्या गोळ्यांनी आयुष्याच्या सायंकाळी आपल्या जन्मदात्यांना घराबाहेर काढून दिलं.

पोटच्या गोळ्यांनी नाकारलेल्यांच्या हाती आले भिक्षापात्र
जन्मदात्यांनाच काढले घराबाहेर : प्रत्येकाचीच कहाणी मन हेलावून टाकणारी
रुपेश कोकावार - बाबुपेठ (चंद्रपूर)
ज्यांना बोट धरून चालायला शिकविलं, मोठ्या प्रेमाने ज्यांचं संगोपन करून मोठही केलं. त्याच पोटच्या गोळ्यांनी आयुष्याच्या सायंकाळी आपल्या जन्मदात्यांना घराबाहेर काढून दिलं. हक्काचं घरटं हरवून बसलले असहाय्य आई-वडील रस्त्यावर आलेत. आता ते चंद्रपूरच्या महाकाली मंदिर परिसरात ४० पेक्षा अधिक वृद्ध महिला-पुरूष भिक्षा मागून आपले पोट भरताहेत. रक्ताच्या नात्याने झिडकारल्यामुळे भिक्षेचे पात्र हाती घेऊन जगणाऱ्या येथील प्रत्येकाचीच कहाणी हृदय पिळवटून टाकणारी आहे.
दोन महिन्यांपूर्वी येथील भिक्षुकांच्या डेऱ्यात दाखल झालेल्या देवकीच्या (बदललेले नाव) नशिबीही याच यातना आल्यात. ती मूळची नांदेड येथील रहिवासी आहे. तिच्याकडे १५ एकर शेती असून तिला एकुलता एक मुलगा आहे. पाच वर्षांपूर्वी पतीचे निधन झाले. ती मुलगा व सुनेसोबत राहू लागली. मात्र पुढे देवकीचे सुनेशी पटेनासे झाले. लहान-लहान बाबींवरून खटके उडायला लागले. त्यानंतर वाद विकोपाला जाऊन एक दिवस मुलाने देवकीलाच तिच्या हक्काच्या घरातून बाहेर काढले. त्यामुळे निराधार झाल्याने ती थेट चंद्रपुरातील महाकाली मंदिर परिसरात दाखल झाली. आता ती भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह भागवित आहे.
दोन मुलांपैकी एक मुलगा वेकोलित मोठ्या पदावर तर नात पोलीस खात्यात असलेल्या ६० वर्षीय प्रमिला (बदलेले नाव) वरही असाच प्रसंग ओढवला आहे. घरात उद्भवलेल्या किरकोळ वादात मुलाने तिला घराबाहेर हुसकावून लावले. त्यामुळे भिक्षा मागण्याशिवाय तिच्यापुढे पर्याय नव्हता. म्हणूनच तिने महाकाली मंदिर जवळ केले. गेल्या एक दिड वर्षापासून ती या परिसरात जीवन जगत आहे.