होमगार्ड सेवकांना सावत्र वागणूक
By Admin | Updated: May 6, 2015 01:24 IST2015-05-06T01:24:47+5:302015-05-06T01:24:47+5:30
होमगार्डस उपपथक गोंडपिंपरी येथील होमगार्ड प्रभारी अधिकारी व पोंभुर्णा येथील ग्रामीण पलटन नायक अधिकारी ...

होमगार्ड सेवकांना सावत्र वागणूक
पोंभुर्णा : होमगार्डस उपपथक गोंडपिंपरी येथील होमगार्ड प्रभारी अधिकारी व पोंभुर्णा येथील ग्रामीण पलटन नायक अधिकारी यांनी आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून स्वत:च्या आर्थिक स्वार्थासाठी मनमानीपणे कारभार करून होमगार्ड सैनिकांवर अन्याय करीत असून या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आहे.
सन २०१४-१५ या कालावधीत आलेले सर्व बंंदोबस्त पलटन नायक अधिकारी विजय कुकडकर हे स्वत: गोंडपिंपरी येथे जाऊन गोंडपिपरी येथील होमगार्ड प्रभारी अधिकाऱ्याशी संगणमत करुन कोणत्या बंदोबस्तावर कोणकोणत्या होमगार्ड सैनिकांना पाठवायचे आणि तो बंदोबस्त किती दिवसाचा आहे, त्यासाठी त्यांच्याकडून किती पैसे घ्यायचे, हे ठरवितात. जो होमगार्ड त्यांनी ठरविल्याप्रमाणे पैसे देण्यास तयार असेल अथवा जवळचा नातेवाईक असेल त्यालाच आलटून पालटून बंदोबस्ताच्या ड्युट्या देत असल्याचा आरोप आहे. सदर होमगार्ड सैनिक त्यांना पैसे दिले तरी ते याबाबतची कुठेही वाच्यता करीत नाहीत. अशी त्यांना त्यांची पक्की खात्री झाली आहे. त्यांनाच लागोपाठ बंदोबस्ताच्या ड्युट्या कशा दिल्या जातात, याबाबत आम्ही होमगार्ड प्रभारी अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता त्यावर त्यांनी आम्ही जे करतो तेच बरोबर आहे, तुम्ही जास्तीची अरेरावी करु नका, तुम्हाला जे करावयाचे असेल ते तुम्ही करा, अधिकारी आमचे आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत जाऊनही तुम्ही आमचे काहीच बिघडवू करु शकत नाही. आम्ही सांगणार तेव्हाच तुम्हाला बंदोबस्ताच्या ड्युट्या मिळतील. आमच्या विरोधात वागाल तर तुम्हाला सेवेतून काढून टाकू, अशा धमक्या दिल्या जातात. त्यामुळे आम्ही होमगार्ड सैनिक दोन्ही अधिकाऱ्यांच्या धाकापोटी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जावून शकत नाही, असे या होमगार्ड सैनिकांनी सांगितले. ग्रामीण पलटन नायब अधिकारी हे पद २० होमगार्डस् सैनिकांच्या बंदोबस्त ड्युटीवर एक पर्यवेक्षक म्हणून असताना कायद्याने उल्लंघन करून जो होमगार्ड सैनिक ठरल्याप्रमाणे त्यांना पैसे देईल किंवा त्यांच्या जवळच्या नात्यातील असेल अशा तीन सैनिकावरच तो अधिकारी म्हणून अवैधरित्या स्वत: ड्युटी करुन भत्ता कमावत आहे. यातून शासनाच्या पैशाची लुट करुन शासनाची फसवणूक करीत आहे व दुसऱ्या होमगार्ड सैनिकांना बंदोबस्त करण्याची संधी न देता त्यांना बंदोबस्ताच्या ड्युटीपासून वंचित ठेवतो. (तालुका प्रतिनिधी)