झरपट नदीपात्राच्या खोलीकरणाला सुरूवात
By Admin | Updated: March 21, 2017 00:37 IST2017-03-21T00:37:30+5:302017-03-21T00:37:30+5:30
महाकाली यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर महानगर पालिकेकडून यात्रेची जय्यत तयारी चालली असून

झरपट नदीपात्राच्या खोलीकरणाला सुरूवात
यात्रेची जय्यत तयारी : हंसराज अहीर यांच्याकडून कामाची पाहणी
चंद्रपूर : महाकाली यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर महानगर पालिकेकडून यात्रेची जय्यत तयारी चालली असून भाविकांना सोईसुविधा पुरविण्यासाठी नियोजन सुरू आहे. भाविकांना पवित्र स्नान करता यावे यासाठी झरपट नदीची स्वच्छता केली जात असून नदी पात्र खोलीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. रविवारी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या कामाची पाहणी केली.
झरपट नदीची होत असलेली दुरवस्था व स्वच्छतेबाबत झालेले दुर्लक्ष व नदीतील दूषित पाणी, नदीपात्रात इकोर्निया वनस्पती वाढत आहे. नदीच्या स्वच्छतेबाबत मागील अनेक वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरू असून महानगरपालिकेच्या माध्यमातून नदीच्या स्वच्छतेचे कार्य ना. अहीर यांच्या पुढाकारातून सुरू झाले आहे. ना. अहीर यांनी झरपट नदीच्या खोलीकरणाकरिता धारीवाल इंन्फ्रास्ट्रक्चवर प्रा. लि. ताडाळी या कंपनीला सामाजिक दायित्व स्वीकारून झरपट नदीचे खोलीकरण करण्यास योगदान द्यावे, असे निर्देश दिले होते. त्यांच्या निर्देशानुसार धारीवाल इंन्फ्रास्ट्रक्चरने झरपट नदीच्या खोलीकरणाचे काम हाती घेतले आहे.
ना. अहीर यांनी रविवारी प्रत्यक्ष मोक्यावर जावून या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे ज्येष्ठ नेते विजय राऊत, मनपा गटनेते अनिल फुलझेले, जिल्हा महामंत्री राजेश मून, जिल्हा सचिव राहुल सराफ, नगरसेवक धनंजय हुड, माजी नगरसेवक शंकर वाकोडे, धारीवाल इंन्फ्रास्टक्चवर लिमि.चे बसाब घोष, संदीप मुखर्जी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सोनवाने, महानगरपालिकेचे अभियंता अनिल घुमडे, महेश बारई, मोहन चौधरी, राजू घरोटे, तेजा सिंह, श्याम कनकम, अशोक सोनी व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश
भेटीदरम्यान ना. अहीर यांनी मनपाचे अधिकारी, पाटबंधारे विभाग, धारीवालचे बसाव घोष यांना कामाबाबत आवश्यक सूचना दिल्या व काम जलदगतीने पूर्ण करण्याचे प्रयत्न करावेत, असे निर्देश दिले. नदीच्या खोलीकरणानंतर सौंदर्यीकरणासाठी निधीची उपलब्धता करण्याचा प्रयत्न केला जाईल. ऐतिहासिक काळापासून अस्तित्वात असलेल्या या नदीचे सौंदर्य अबाधित राहिले पाहिजे, असेही ना. अहीर यांनी यावेळी सांगितले.