वन अधिकारी बनून बल्लारपूरच्या व्यापाऱ्याला १५ लाखाला फसविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:20 IST2021-07-20T04:20:24+5:302021-07-20T04:20:24+5:30
आरोपीस वाराणसी येथून अटक बल्लारपूर : मध्यप्रदेशातील हाऊमरिया टायगर प्रोजेक्ट येथे मी सहायक वन अधिकारी आहे व साईड बिझनेस ...

वन अधिकारी बनून बल्लारपूरच्या व्यापाऱ्याला १५ लाखाला फसविले
आरोपीस वाराणसी येथून अटक
बल्लारपूर : मध्यप्रदेशातील हाऊमरिया टायगर प्रोजेक्ट येथे मी सहायक वन अधिकारी आहे व साईड बिझनेस म्हणून लाकडाचा व्यापार करतो, असे सांगून आरोपी सुधाकर जितेंद्रसिंग (वय ३६, रा. दिलथरा, जिल्हा बालिया) याने बल्लारपूरचे लाकूड व्यवसायी लक्ष्मण वेलजीभाई पटेल यांच्याकडून लाकडाचा सौदा करून १५.५ लाख रुपये ॲडव्हान्स घेऊन लाकूड न पाठविता फसवणूक केली. आरोपीला बल्लारपूर पोलिसांनी उत्तरप्रदेशातील वाराणसी येथून रविवारी अटक केली. न्यायालयात हजर केले असता आरोपीला २३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
फिर्यादी लक्ष्मण पटेल हे बल्लारपुरातील फार जुने लाकूड व्यवसायिक आहेत. नऊ महिन्याआधी मध्यप्रदेशातील हाऊमरिया टायगर प्रोजेक्टमध्ये मी सहायक वन अधिकारी आहे व माझा लाकूड विक्रीचा व्यवसाय आहे, असे खोटे सांगून आरोपी सुधाकर जितेंद्र सिंग याने पटेल यांची प्रत्यक्ष भेट घेतली. अनेक दिवस संपर्कात राहिला व विश्वास संपादन केल्यावर आरोपीने सागवान विक्रीचा सौदा केला आणि फिर्यादीकडून १५.५ लाख रुपये ॲडव्हान्स म्हणून घेतले. परंतु अनेक दिवस उलटूनही लाकूड पाठवले नाही. यात आपली फसवणूक झाली आहे, हे फिर्यादीच्या लक्षात येताच पटेल यांनी आरोपीची तक्रार बल्लारपूर पोलीस ठाण्यात केली. पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी तत्काळ तांत्रिक तपासाद्वारे आरोपीचा शोध घेतला व तपास अधिकारी प्रमोद रास्कर यांना पाठवले. परंतु आरोपी अटक टाळण्यासाठी वारंवार त्याचे ठिकाण बदलत होता. त्यामुळे पोलीस तपासाला मर्यादा आली होती. मात्र पोलिसांनी विशेष कसब वापरून आरोपीला उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून बल्लारपूर पोलीस ठाण्यात आणून ४८ तासांच्या आत अटक केली. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक रास्कर, रणविजय ठाकूर, राजेश सोनवाणे यांनी केली.