बदल्यांमुळे आप्तांची ताटातूट अन् भावनांचा कल्लोळ
By Admin | Updated: April 27, 2015 01:02 IST2015-04-27T01:02:00+5:302015-04-27T01:02:00+5:30
बदलीची प्रक्रिया ही शासकीय नियमात मोडणारी असली तरी खाकी वर्दीतला ‘माणूस’ देखील या बदलीच्या प्रक्रियेत कमालीचा हळवा झाला आहे.

बदल्यांमुळे आप्तांची ताटातूट अन् भावनांचा कल्लोळ
रूपेश कोकावार बाबूपेठ (चंद्रपूर)
बदलीची प्रक्रिया ही शासकीय नियमात मोडणारी असली तरी खाकी वर्दीतला ‘माणूस’ देखील या बदलीच्या प्रक्रियेत कमालीचा हळवा झाला आहे. पाच वर्षांच्या वास्तव्यात जपलेल्या अनेक नात्यांना जड अंत:करणाने पुन्हा भेटूच, अशी प्रेमळ ग्वाही देत त्याला आता निरोप घ्यावा लागणार आहे. नव्या गावातील नव्या घरात त्याला नव्यानेच संसार उभा करावा लागणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजीव जैन यांनी ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना एकाच पोलीस ठाण्यात पाच वर्षे सेवा दिली, अशा ४८४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या केल्या. त्याची यादीही शनिवारी जाहीर करण्यात आली. गेल्या पंधरवड्यापासून बदलीच्या कल्पनेनं अस्वस्थ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या हाती येत्या एक दोन दिवसांत बदलीचे आदेश पडतील. यातील अनेकजण स्थानिक पोलीस वसाहतीत गेल्या पाच वर्षांपासून वास्तव्याला होते, तर काहीजण शहरात कुठेतरी किरायाच्या घरात राहत होते. या पाच वर्षांच्या वास्तव्यात सहाजिकच पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांचे शहराच्या वातावरणाशी, वास्तव्य असलेल्या घराशी, अवतीभोवती राहणाऱ्या कुुटुंबांशी भावनिक नाते जुळले. चिल्यापिल्यांचाही मित्र परिवार वाढला. मात्र आता अचानक बदली झाल्याने पोलीस कुटुंब हळवे झाले आहे.
नव्या गावात जाताना तेथे सर्वच प्रक्रिया त्यांना नव्याने कराव्या लागणार आहे. पोलीस वसाहतीत घर मिळाले नाही, तर चांगल्या किरायाच्या घराचा शोध, मुलांचा शाळा प्रवेश ही महत्वाची कामेही त्यांना आता नव्याने करावी लागणार आहे.
पोलीस खाते हे अतिशय शिस्तीचे खाते समजले जाते. त्यामुळे खात्याची शिस्त पाळताना या पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या भावनांना मुठमाती देत नेमून दिलेल्या ठिकाणी कर्तव्यावर रुजू व्हावे लागणार आहे.
कसे सोडावे जिव्हाळ्याचे घर ?
सतत पाच वर्ष ज्या घरात वास्तव्य केले. ज्या घराशी लळा लावला. शेजाऱ्यांशी शेजारधर्म पाळत असताना भावनिक नाते जुळले. हे सर्व नाते, ते घर, बदली आदेश हाती मिळताच डोळ्याआड होणार आहे. याची वेदना निश्चितच वरकरणी कणखर समजल्या जाणाऱ्या या पोलिसांच्या मनातही असेल. पोलीस कर्मच्याऱ्यांच्या पत्नीने पैशांची काटकसर करुन पाच वर्षात एक-एक वस्तू जमवत घराला सजविले. आपण सजविलेले घर आपणच अस्ताव्यस्त करताना तिलाही वेदना होतील. पाणावलेल्या डोळ्यांनीच तिला या वस्तु एखाद्या पोत्यात जमा कराव्या लागणार आहे. मुलाबाळांचे तर घराशी, त्या परिसराशी वेगळेच नाते निर्माण झाले असते. म्हणून त्यांना घर सोडून जाणे नकोसे होते. मात्र पोलिसांना हे दिव्य पार पाडत सर्वांना सांभाळायचे आहे.