दूषित राजकारणामुळे सिंदेवाहीचा विकास खुंटला
By Admin | Updated: August 6, 2016 00:44 IST2016-08-06T00:44:59+5:302016-08-06T00:44:59+5:30
सिंदेवाही ग्रामपंचायतीने शासनाच्या विविध योजना राबविल्या, त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले.

दूषित राजकारणामुळे सिंदेवाहीचा विकास खुंटला
कार्यकर्ते झाले पुढारी : प्रशासनाचेही दुर्लक्ष
सिंदेवाही : सिंदेवाही ग्रामपंचायतीने शासनाच्या विविध योजना राबविल्या, त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. विकास कामाच्या नियोजनाअभावी हे सारे घडले. राजकीय हेवेदावे, कामाचा निकृष्ट दर्जा, कर्मचाऱ्यांची खोगीर भरती, पदाधिकारी ठेकेदार बनण्याची प्रवृत्ती या बाबींमुळे २५ वर्षाच्या कालावधीत सिंदेवाही नगराचा विकास शून्य राहिला आहे.
लोकशाहीत जनतेद्वारा निवडून दिलेला प्रतिनिधी लोकहितार्थ काम करेल, अशा आशावाद व्यक्त केला गेला. मात्र तो आशावाद आजच्या स्थितीत लोप पावला आहे. नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत अमाप पैसा खर्च करायचा व निवडून आल्यानंतर खर्च झालेला पैसा काढायचा, हीच पद्धत आता रुढ होवू लागली आहे. यासाठी कुठेतरी शासनाकडून पायबंद घातला गेला पाहिजे.
गत २५ वर्षाच्या कालावधीत सिंदेवाही नगराचा कायापालट होईल, अशी जनतेची अपेक्षा होती. मात्र सिंदेवाही नगराची सुधारणा झाली नाही. शहरातील वॉर्डावॉर्डात रस्त्यांची दुर्दशा, बेवारस कुत्र्याचा हैदोस, मोकाट जनावरांचा सुळसुळाट, राष्ट्रीय महामार्गावरील बंद पथदिवे, १९७४ ची जीर्ण नळ योजना, स्मशानभूमी व समाज मंदिराची दुर्दशा, शासकीय ग्रामीण रुग्णालय समस्यांचे माहेरघर बनले आहे. या रुग्णालयात आधुनिक सोयीसुविधा नसल्यामुळे रुग्णांना चंद्रपूर, ब्रह्मपुरी, गडचिरोलीकडे धाव घ्यावी लागते.
‘आपला गाव, आपला विकास’ अंतर्गत गावाचा व नगराचा विकासाचा आराखडा तयार करणे गरजेचे आहे. सर्व नगर पंचायतींना शासनाकडून निधी मिळाला. परंतु सिंदेवाही नगर पंचायतीला निधी मिळाला नाही. लोकप्रतिनिधीकडून विकासाच्या कामाचा पाठपुरावा केला जात नाही. उलट विकास कामात अडथळा निर्माण करण्याचे काम स्थानिक पुढाऱ्यांकडून ेकेले जात असल्याची चर्चा जनतेत आहे.
एकदंरीत राजकीय उदासीनता, स्वार्थी राजकारण, राजकीय मतभेद, गटबाजी व नेतृत्वाचा अभाव यामुळे सिंदेवाही नगर विकासापासून वंचित राहिला आहे. (तालुका प्रतिनिधी)
पुढाऱ्यांचा पूर ; मात्र विकास कामांचा पत्ता नाही
सद्यास्थितीत सिंदेवाही नगरात पुढाऱ्यांचा महापूर आला आहे. कार्यकर्ता म्हणून काम करणारे कमी आणि पुढारी म्हणून मिरविणारे विविध पक्षाचे नेते जास्त दिसून येत आहेत. नगराच्या विकासाच्या दृष्टीकोणातून सर्वसामान्याच्या हक्कासाठी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, विकास कामे खेचून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्नशील असावे अशी अपेक्षा नागरिकांची असते. परंतु नगरात स्वत:ला पुढारी म्हणून मिरविणारे, नगराचा विकास सोडून राजकारण खेळण्यात दंग असल्याने विकासाला खीळ बसली आहे. सिंदेवाही नगर पंचायत व्हावी याकरिता सिंदेवाही तालुका विकास संघर्ष समितीचे आंदोलन, ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार, माजी सरपंच भोजराज सोरते यांचे बेमुदत उपोषण यामुळे नगर पंचायत निर्माण झाली.
सिंदेवाही दुदैवी तालुका
सिंदेवाही तालुक्याची निर्मिती झाली, तेव्हापासून हा तालुका दुदैवीच ठरला आहे. सिंदेवाही तालुका हा पूर्वी सावली विधानसभा मतदार संघात होता. त्यानंतर या तालुक्याचा चिमूर विधानसभा मतदार संघात समावेश झाला. त्यानंतर सन २००५ मध्ये या तालुक्याचा ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघात समावेश झाला. या कालावधीत सन २००४ ते २०१४ पर्यंत सतत १० वर्षे प्रा. अतुल देशकर हे ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे आमदार म्हणून प्रतिनिधीत्व केले. त्यावेळी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी शासन होते. परंतु, त्यांनाही या तालुक्याच्या विकासाकडे लक्ष देण्यास फारसे यश आले नाही. सन २०१४ मध्ये ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार विजयी झाले. त्यामुळे ते ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. तर महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आहे. आमदार आहेत, पण सत्ता नाही. त्यामुळे सिंदेवाही तालुका हा विकासाबाबत दुदैवी ठरला आहे. भाजप व काँग्रेस यांच्या अंतर्गत राजकारणामुळे सिंदेवाही नगराची दुर्दशा होत आहे. आता नगरवासीयांना विकासाच्या प्रतीक्षेतच जीवन जगावे लागणार आहे.