तालुका झाला; मात्र समस्या जैसे थे

By Admin | Updated: July 3, 2015 01:24 IST2015-07-03T01:24:54+5:302015-07-03T01:24:54+5:30

अतिदुर्गम गावांचा विकास व्हावा, त्यांना सोयीसुविधा त्वरित उपलब्ध व्हाव्यात, नागरिकांना शासकीय कामे पूर्ण करताना ...

Became taluka; Just like the problems were | तालुका झाला; मात्र समस्या जैसे थे

तालुका झाला; मात्र समस्या जैसे थे

कोरपना : अतिदुर्गम गावांचा विकास व्हावा, त्यांना सोयीसुविधा त्वरित उपलब्ध व्हाव्यात, नागरिकांना शासकीय कामे पूर्ण करताना व्यत्यय येऊ नये, यासाठी कोरपना तालुक्याची निर्मिती करण्तात आली. मात्र तालुका निर्मितीनंतरही येथील नागरिकांच्या समस्या सुटल्याच नाहीत.
तालुक्यातील अतिदुर्गम आणि आदिवासी नागरिकांच्या अनेक समस्या आहेत. रस्ते, वीज, पाणी, शिक्षण एवढेच नाही तर रोजगाराचा प्रश्न आवासून उभा आहे. रोजगारासाठी अनेक नागरिक तालुका सोडून इतरत्र भटत आहेत. त्यामुळे त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे. एक ना अनेक समस्या असलेल्या कोरपना तालुक्यामध्ये शासकीय कार्यालयातील विविध पदे रिक्त आहेत. या ठिकाणी असलेल्या ३३ केव्ही विद्युत उपकेंद्र, पंचायत समिती, पोलीस ठाणे, पशुवैद्यकीय दवाखाना, येथील कनिष्ठ अभियंता, संवर्ग विकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, पशुवैद्यकीय अधिकारी ही प्रमुख पदे रिक्त असल्याने प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर काम सुरू आहे. पंचायत समिती, पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, भूमीअभिलेख सहायक निबंधक सहकारी संस्था, एकात्मिक बालविकास प्रकल्प आदी कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने कामकाज प्रभावित होत आहे. काही अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. परिणामी अनेक शासकीय योजना असतानाही त्या नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे येथील रिक्त पदे त्वरित भरुन काढण्याची व विकासाला चालना द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये अद्याप पाणीपुरवठा नाही. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. काही गावात रस्ते, वीज नसल्याने विकासाला खीळ बसली आहे. केवळ कागदोपत्री योजना राबवून अधिकारी मोकळे होत आहेत. आंध्र आणि महाराष्ट्र सीमेवर असलेल्या या तालुक्याचा विकास करायचा असेल, तर शासकीय योजना राबविणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Became taluka; Just like the problems were

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.