सौंदर्यीकरणाचे काम संथगतीने
By Admin | Updated: May 6, 2015 01:25 IST2015-05-06T01:25:52+5:302015-05-06T01:25:52+5:30
येथील नगर परिषद क्षेत्रातील कोट तलाव सौंदर्यीकरणाचे काम सुरु होऊन दोन महिने झाले लोटले आहे.

सौंदर्यीकरणाचे काम संथगतीने
ब्रह्मपुरी : येथील नगर परिषद क्षेत्रातील कोट तलाव सौंदर्यीकरणाचे काम सुरु होऊन दोन महिने झाले लोटले आहे. मात्र काम संथगतीने सुरू असल्याने पावसाळ्यात नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत.
कोट तलाव सौंदर्यीकरणाचे काम राज्य सरोवर संवर्धन विभाग मंत्रालय मुंबई यांच्या विद्यमाने ४ कोटी ५० लाख रूपयांच्या निधीतून करण्यात येत आहे. त्यातील अर्धाअधिक निधी एक वर्षापूर्वीच नगरपालिकेला प्राप्त झाला होता. त्याअंतर्गत एजन्सीची नेमणूकीला संथ गतीने प्रक्रिया राबवून आपल्या सोयीने कंत्राट एजन्सी नेमण्यात आली, यामध्ये मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण करून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सदर तलाव ८.१० हेक्टर आर आराजीचा असून अंदाजे दीड मीटर औरसचौरस खोलीकरण करणे अपेक्षित होते. मात्र कुठे कमी तर कुठे जास्त याच्या अंदाजाने खोलीकरण करण्यात आले आहे.
सरासरी खोलीकरणाचे उतरते स्वरूप मिळते जुळते नाही, हे आताच्या कामावरुन दिसून येत आहे. सदर काम पावसाळ्यापूर्वी गाळ काढून मान्सूनपूर्वी काम होणे अत्यावश्यक होते. पावसाळ्या लागल्यानंतर गाळ काढण्यासाठी जेसीबी व टिप्पर जाणे अशक्य असल्याने नगरपालिका प्रशासन, पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन ताबडतोब कामाला गती वाढविण्याची गरज आहे.
पावसाळ्यापूर्वी काम न झाल्यास गाळ काढण्याच्या कामाचे एक कोटी रुपये वाया जातील व सर्वसामान्य जनतेचा पैसा कामात लागणार नाही. सध्या काढलेला गाळ कुठे टाकणार, याचेही नियोजन नगरपालिकेकडे सध्या नाही. त्यामुळे कंंत्राटदार नगरपालिकेला वारंवार विचारणा करीत आहे.
काढाली रोडला लागून महसूल विभागाची जागा आहे. ही जागा खदान म्हणून ओळखल्या जाते. तिथे गाळ टाकल्यास खड्डे बुजल्या जातील व गाळ काढण्याचे काम सुलभ होईल व महसूल विभागाला ती जागा बांधकाम प्रयोजनासाठी वापरता येईल, अशा प्रकारची तोंडी सूचना नागरिकांकडून केल्या गेली आहे. या दृष्टीने उपविभागीय अधिकारी राजस्व यांनी त्वरित कार्यवाही करुन तलावाच्या सौंदर्यीकरण विकासाचा मार्ग मोकळा करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
या कामाची दखल घेऊन आमदार विजय वडेट्टीवार यांनी तलावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्याधिकारी व नगरपालिका अध्यक्ष ब्रह्मपुरी यांना उचित सूचना करुन गाळ काढण्याच्या संदर्भात त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले व विलंब होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे यंत्रणेचे कामाचे स्वरूप थोडे वाढले आहे. नागरिकांनी कंत्राटदाराशी चर्चा केली असता, सदर गाळ सभोवताल रस्त्यासाठी उपयोगात आणायचा, असून ते काम अपेक्षित आहे. परंतु हा गाळ रस्त्यासाठी उपयोगात आल्यास त्या खराब गाळातून झिरपणारे पाणी परत तलावात जाऊन शुद्धीकरण होणारे तलाव परत प्रदूषित होईल व जैसे थे अवस्था प्राप्त होईल व शासनाचे पैसे पाण्यात जातील, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संपूर्ण गाळ बाहेर टाकावा अशी नागरिकांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)