किन्ही तलावाजवळील झुडुपात पट्टेदार वाघाची दडी
By Admin | Updated: January 7, 2017 00:40 IST2017-01-07T00:40:58+5:302017-01-07T00:40:58+5:30
सिंदेवाही वनपरिक्षेत्रातंर्गत किन्ही तलावाजवळील झुडुपात पट्टेदार वाघ बसून असल्याचे आज शुक्रवारी सकाळी ६ वाजता नागरिकांना आढळून आले.

किन्ही तलावाजवळील झुडुपात पट्टेदार वाघाची दडी
सिंदेवाही : सिंदेवाही वनपरिक्षेत्रातंर्गत किन्ही तलावाजवळील झुडुपात पट्टेदार वाघ बसून असल्याचे आज शुक्रवारी सकाळी ६ वाजता नागरिकांना आढळून आले. रात्री उशिरापर्यंत वाघाने तिथेच ठाण मांडला असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सदर वाघ अंदाजे १० वर्षांचा असून जंगलात शिकार करुन तो पाणी पिण्याकरिता किन्ही तलावाजवळ आला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. गावाजवळ जिवंत पट्टेदार वाघ आढळल्यामुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघ पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्याचा वावर फार मोठ्या प्रमाणात आहे. सदर पट्टेदार वाघ झुडूपात लपून बसला आहे. या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत कामडी यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, वन कर्मचारी, पोलीस उपनिरीक्षक व पोलीस चमू वाघाला संरक्षण देण्याकरिता प्रयत्न करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत सदर वाघ झुडूपात दडी मारुनच बसला आहे. त्याला सुखरुपपणे बाहेर काढून पिंजऱ्यात पकडण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरु आहेत. (पालक प्रतिनिधी)