सावधान! वैधता संपलेल्या सिलिंडरपासून धोका
By Admin | Updated: April 1, 2016 01:24 IST2016-04-01T01:24:18+5:302016-04-01T01:24:18+5:30
ग्राहक जागृतीसाठी सर्व स्तरावर प्रयत्न होत आहेत. मात्र, असे असतानाही काही बाबी यातून सुटताना दिसतात. दैनंदिन वापरातील

सावधान! वैधता संपलेल्या सिलिंडरपासून धोका
अनेक ग्राहक अनभिज्ञ : ‘एक्सपायरी डेट’ सिलिंडर ठरू शकतो धोकादायक
चंद्रपूर : ग्राहक जागृतीसाठी सर्व स्तरावर प्रयत्न होत आहेत. मात्र, असे असतानाही काही बाबी यातून सुटताना दिसतात. दैनंदिन वापरातील घरगुती सिलिंडरच्या बाबतीत ग्राहकांत कमालीची अनभिज्ञता दिसून येते. प्रत्येक वस्तुची कालमर्यादा ठरलेली असून सिलिंडरलाही ती आहे, ही बाब कुणीच गंभीरतेने घेत नाही. आॅईल कंपन्यांपासून वितरकांपर्यंत सर्वांचेच याकडे दुर्लक्ष होत असून पुरवठा विभागाच्याही अखत्यारितील ही बाब नाही. यामुळे ग्राहकांनी जागरूकता बाळगणे गरजेचे झाले आहे.
दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक बाब झालेल्या सिलिंडरचा पुरवठा आणि वापराबाबतचे नियम ग्राहकांना माहितीच असेल याची शाश्वती नाही. या नियमांबाबत ग्राहकांना माहिती देण्याचे काम गॅस कंपन्यांचे आहे. मात्र याची अंमलबजावणी कितपत होते, यावर प्रश्नचिन्ह उभे राहते. सिलिंडरला ‘एक्सपायरी डेट’ असते, हे अनेकांना माहितीच नाही.
जिल्ह्यात गॅसधारकांची संख्या लाखोंवर आहे. प्रत्येक उत्पादनाला जशी निर्मितीची तारीख असते तसेच ते उत्पादन किती दिवसांपर्यंत वापरण्यायोग्य आहे, याचाही अवधी ‘त्या’ उत्पादनावर नोंदविलेला असतो. घरगुती आणि व्यावसायिक वापरात असलेल्या गॅस सिलिंडरच्या बाबतीतही असेच आहे. गॅस सिलिंडरच्या बाबतीत सुरक्षेचे काही मापदंड आहेत. वितरक आणि गॅस एजन्सीच्या भाषेत सिलिंडरची ‘एक्सपायरी डेट’ यालाच ‘ड्यू फॉर फिलिकल टेस्टिंग’ असे म्हणतात. परंतु, सर्वसामान्यांच्या भाषेत याला ‘एक्सपायरी डेट’ असेच म्हणतात. नवीन सिलिंडर घरी किंवा व्यवसायासाठी आणल्यानंतर त्याची पुर्नतपासणी करून घेतल्यास भविष्यात होणारा अपघात टाळता येईल. मात्र, शहरी व ग्रामीण भागात याविषयी अनभिज्ञता असून जागृतीची गरज आहे. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी आर. एस. आळे यांच्याशी संपर्क साधला असता, संर्पक होऊ शकला नाही. (स्थानिक प्रतिनिधी)