लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नागरिकांनो सावधान ! दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत दोनशेपेक्षा अधिक रुग्णांची भर पडते आहे. यासोबतच मृत्यूसंख्याही वाढत आहे. ही बाब दिवसागणिक चिंता वाढणारी ठरत आहे. शनिवारी २२३ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर तिघांचा कोरोनाने बळी घेतली आहे. यामध्ये एक नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील एक, तर अन्य दोघे चंद्रपुरातील आहे. जिल्ह्यात मागील २४ तासात १०३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २६ हजार ९२४ वर पोहोचली आहे. तसेच सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २४ हजार ६४५ इतकी झाली आहे. सध्या १८५९ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख ६८ हजार ३९३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख ३६ हजार ६११ नमुने निगेटीव्ह आले आहेत.आज मृत झालेल्यामध्ये सावरगाव ता. नागभीड येथील ५८ वर्षीय पुरूष, चंद्रपूर शहरातील ६० वर्षीय व ६५ वर्षीय पुरूषांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४२० बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३८१, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.आज बाधित आलेल्या २२३ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील ७२, चंद्रपूर तालुका २१, बल्लारपूर १४, भद्रावती १७, ब्रम्हपुरी सात, नागभीड १८, सिंदेवाही चार, मूल १०, सावली दोन, पोंभुर्णा एक, गोंडपिपरी एक, राजूरा नऊ, चिमूर ११, वरोरा २५, कोरपना पाच व इतर ठिकाणच्या सहा रुग्णांचा समावेश आहे.कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
जिल्ह्यात लसींचा तुटवडा ?लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. शिवाय, १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली. मात्र, सध्या सुमारे १० हजार लस उपलब्ध आहेत. जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे कोविडशिल्ड लसींची मागणी केली. सोमवारपर्यंत जिल्ह्याला डोस मिळाले नाही तर मंगळवारी काही केंद्र बंद ठेवावे लागणार आहे, अशी माहिती सुत्राने दिली.