सावधान ! सिगारेट ओढणे पडू शकते महागात !
By Admin | Updated: August 9, 2016 00:42 IST2016-08-09T00:42:15+5:302016-08-09T00:42:15+5:30
सध्या तरुणाईमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढले आहे. वाट्टेल तिथे सिगारेट ओढून मोठ्या दिमाखाने धूर फेकला जातो

सावधान ! सिगारेट ओढणे पडू शकते महागात !
दोनशे रुपयांचा दंड : धुम्रपानविरोधात प्रशासनाचे गंभीर पाऊल
चंद्रपूर : सध्या तरुणाईमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढले आहे. वाट्टेल तिथे सिगारेट ओढून मोठ्या दिमाखाने धूर फेकला जातो. तरुणांमध्ये सध्या क्रेझ असलेले हे धोकादायक व्यसन आता त्यांना महागात पडू शकते. आता सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणे वा सिगारेट पिताना आढळल्यास तात्काळ दोनशे रुपये दंड वसूल केला जाणार आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ही कारवाई केली जाणार आहे.
तंबाखू सेवनामुळे होणारे कर्करोगाचे प्रमाण अलिकडे वाढले आहे. याची दखल घेत शासनाने जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या आदेशानुसार सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन समन्वय समिती तयार केली आहे. स्वत: जिल्हाधिकारी याचे अध्यक्ष असून सचिव जिल्हा शल्य चिकित्सक आहेत. ही समिती जनजागृती करण्यासोबतच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारे व धूम्रपान करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईदेखील करणार आहे.
राज्यातील काही जिल्ह्यात हा राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सुरू केला आहे. याचे चांगले परिणाम दृष्टीस पडत आहे. त्यामुळे ही योजना चंद्रपूर जिल्ह्यातही राबविण्याचा निर्णय येथील प्रशासनाने घेतला आहे. शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात या संदर्भात आतापर्यंत दोनदा बैठक घेण्यात आली आहे. यात जिल्हा समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून सचिव जिल्हा शल्य चिकित्सक आहेत. यासोबत समितीत पोलीस विभाग, कृषी विभाग, शिक्षण विभाग, माहिती अधिकारी, कामगार विभाग, अन्न व औषध प्रशासन, विक्रीकर विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी व महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
आता ही जिल्हा समन्वय समिती जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयात समिती तयार करणार आहे. तालुकास्तरावरही एक समिती गठीत केली जाणार आहे. ही समिती तंबाखू नियंत्रण कायदा २००३ ची अंमलबजावणी करणार आहे. या कायद्यांतर्गत तंबाखू खाणे व सिगारेट ओढणाऱ्यांवर कलम ४,५,६ (अ), ७ अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार आहे. रुग्णालय परिसर, बसस्थानक, रेल्वे स्थानक व इतर सार्वजनिक ठिकाणी कुणी धुम्रपान करताना आढळला तर त्याच्याकडून तात्काळ २०० रुपये दंड वसूल करण्याचा अधिकार समिती सदस्यांना दिला आहे. (शहर प्रतिनिधी)
जिल्ह्यात तंबाखू नियंत्रण कार्यक्रम लवकरच सुरू करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा समन्वय समितीदेखील तयार करण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात धुम्रपान करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार आहोत. कुणीही परिसरात सिगारेट व तंबाखू खाताना आढळला तर त्याच्याकडून २०० रुपये दंड वसूल केला जाणार आहे.
-डॉ. विनोद पाकधुने,
जिल्हा असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अधिकारी,
जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर.